मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. मालिका, चित्रपट व वेबसीरिजमधून त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. अभिनयाबरोबरच सिद्धार्थला फिरण्याची प्रचंड आवड असून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेला सिद्धार्थ त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ त्याच्या चाहत्यांसमोर अनेक गुड न्यूज देत आहे. अशातच सिद्धार्थने आणखी एक गुड न्यूज सर्वांसमोर शेअर केली आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याची आई सीमा चांदेकर यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. (Siddharth Chandekar mother Second Marriage)
सिद्धार्थ चांदेकरने आई सीमा यांचे दुसऱ्यांदा लग्न लावले असून त्यांच्या लग्नाचे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. हे फोटोज शेअर करताना सिद्धार्थ म्हणतो, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं!”
सिद्धार्थच्या या पोस्टवर मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंटद्वारे सिद्धार्थचे कौतुक करत सीमा चांदेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सीमा यांना शुभेच्छा देताना म्हणाल्या, “हे खूप सुंदर आहे सिद्धार्थ, सीमाचे अभिनंदन. मी तिच्यासाठी खूप आनंदी असून तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदन. तुम्हा दोघांवर खूप प्रेम आहे.” तर हेमंत ढोमे म्हणतोय, “Congratulations seems!!! and so so proud of siddhu!!! खूप खूप प्रेम!”. अभिनेत्री ऋजुता देशमुखने “Superb News. Congratulations to Seema maushi and kudos to you @sidchandekar” अशी कमेंट केली आहे. तर सई ताम्हणकरने “Party pahije Seems!!!!”, अशी हटके कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”
याचबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, आदित्य सरपोतदार, मधुराणी प्रभुळकर, स्पृहा जोशी, आदिनाथ कोठारे, प्रसाद ओक, ऋतुजा बागवे, गौरी नलावडे व अन्य कलाकारांनी सिद्धार्थच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करत अभिनंदन केले. शिवाय, सीमा चांदेकर यांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं नशिब उजळलं, हिंदी चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार, फोटो व्हायरल
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचं आई सीमा चांदेकर यांच्यावर विशेष प्रेम आहे. ‘जिवलगा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर ही मायलेकाची जोडी दिसली आहे. शिवाय, सोशल मीडियाद्वारे मायलेकाचं हे खास बॉण्डिंग त्याच्या अनेकदा पाहायला मिळतं. सिद्धार्थची आई सिंगल मदर होती. पण सिद्धार्थने वयाच्या उत्तरार्धात आपल्या आईचे दुसरे लग्न लावून समाजात एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. (Siddharth Chandekar mother Second Marriage)