आपला अभिनय व नृत्याविष्काराने रसिक प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक नाव हमखास घेतलं जातं, ती म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. छोट्या पडद्यावरून कलाक्षेत्रात पदार्पण करणारी अमृता आज मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अमृताला अभिनय व डान्सची आवड तर आहे, शिवाय तिला फिरण्याची प्रचंड आवड आहे. तिची देवावर प्रचंड आस्था असल्याने ती देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांना नेहमीच भेट देत असते. (Amruta Khanvilkar Amarnath Yatra Video)
देशासह जगभरातील भाविकांचे विशेष आकर्षण असलेल्या अमरनाथ यात्रा जूनपासून सुरु झाली आहे. ही यात्रा सर्वात अवघड अशी यात्रा मानली जाते. बर्फापासून तयार होणारे नैसर्गिक शिवलिंग पाहण्यासाठी दरवर्षी लाखो शिवभक्त अमरनाथला भेट देतात. अभिनेत्री अमृता खानविलकरही काही दिवसांपूर्वी याच यात्रेवर गेली होती. तिने तेथे शिवलिंगाचे दर्शन घेतले. या यात्रेचा संपूर्ण प्रवास व्लॉगच्या रूपात तिने आपल्या युट्युब चॅनेलवर नुकताच शेअर केला आहे.
अमृताने या संपूर्ण प्रवासाचे दोन व्हिडिओज आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. व्लॉगच्या पहिल्या भागात ती अमरनाथचा संपूर्ण प्रवास दखवते. तर दुसऱ्या भागात ती या प्रवासाचे आपल्या शब्दात वर्णन करताना दिसते. या व्हिडिओत अमृता तिच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करताना सांगते, “मी वर्षाच्या सुरुवातीला कणकेश्वर मंदिरात गेली. मी नेहमीच त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जाते. जेव्हा माझं इंदौरला चित्रपटाचं शूट होतं, तेव्हा मी उज्जैनच्या महाकाल मंदिर व ओंकारेश्वरचे दर्शन घेतले. तेव्हा मी दीड महिन्यापूर्वी अमरनाथ यात्रेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं.”
हे देखील वाचा – अचानक केईएम रुग्णालयामध्ये पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “काम करणारे…”
“माझं भाग्य असं की, यात्रेचं रजिस्ट्रेशन अर्ज स्वीकारण्यात आला. माझी मेडिकल चाचणी झाली, कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर मी अमरनाथला गेली. खूप चांगला अनुभव मिळाला, असं सांगत अमरनाथ यात्रेच्या प्रवासाचा संपूर्ण अनुभव शेअर केला. यात्रा खरंच अवघड असून येताना मी खूपच थकले होते. त्यामुळे मी पालखी घेतली. पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ट्रेक करत जा. पण मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका”, असं अमृताने तिच्या व्लॉगमध्ये म्हटलं आहे.
हे देखील वाचा – प्रदर्शनापूर्वीच ‘सुभेदार’ चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, रचला नवा विक्रम
अमृताच्या या व्लॉगवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अमृताने देखील चाहत्यांच्या कमेंट्सना प्रतिसाद दिला आहे. अमृता खानविलकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अमृता काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दिसली होती. शिवाय ती अनेक वेबसीरिजमध्ये दिसली असून चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. (Amruta Khanvilkar Amarnath Yatra)