अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरिजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकंच नव्हे तर सर्वत्र या वेबसीरिजच कौतुकही केलं जात आहे. तृतीयपंथी यांवर आधारित हा सिनेमा आहे. या वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व त्यांना ओळख मिळवून देणाऱ्या तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या संघर्षाची कहाणी या वेबसीरिजमधून मांडण्यात आली आहे. या मालिकेत मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. दिग्दर्शक रवी जाधव यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली असून अभिनेता सुव्रत जोशी, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर या मराठी कलाकारांना वेबसीरिजमध्ये पाहणं रंजक ठरलं. (Krutika Deo On Taali)
‘ताली’ या वेबसीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री कृतिका देव हिने गौरी सावंत यांच्या बालपणीची म्हणजेच गणेश ही भूमिका साकारली होती. तिच्या ही भूमिकेचं, तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मात्र ही भूमिका साकारणं हे एक कृतिका समोर एक आव्हान होतं. शूटिंगदरम्यानचा आलेला एक किस्सा कृतिकाने एका मुलाखतीदरम्यान सांगितला. कृतिकाचा हा किस्सा ऐकून अंगावर शहारे येतील यांत वादच नाही.
कृतिकाने किस्सा सांगत म्हटलं की, “गणेशला मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागावी लागली होती. ‘ताली’मधील हा सीन शूट करणं कठीण होतं. आम्ही मुंबईच्या रस्त्यांवर हिडन कॅमेऱ्याने हा सीन शूट केला आहे. रस्त्यावर मी एकटीच उभी होते. सिग्नलची लाल लाईट दिसली की मी भीक मागण्यासाठी रस्त्यावर यायचे. एका व्यक्तीने खरंच मला भिकारी समजून १० रुपये दिले होते.”
कृतिका पुढे म्हणाली, “सीन शूट करतानाचा हा प्रसंग आठवला की अजूनही माझ्या अंगावर शहारे येतात. त्या व्यक्तीला मी खरंच भीक मागत आहे, असं वाटलं होतं. माझ्या अभिनयासाठी ही एक प्रकारची दाद होती. मात्र, त्या भावना फार वेगळ्या होत्या. ती १० रुपयांची नोट आजही मी जपून ठेवली आहे. गौरी व त्यांच्यासारख्या अशा कितीतरी जणांना या परिस्थितीतून जावं लागलं असेल, याची जाणीव मला या प्रसंगानंतर झाली”.
‘ताली’ वेब सीरिजचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे. तर या वेबसीरिजचे लेखक क्षितिज पटवर्धन आहेत. या सीरिजमध्ये ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, हेमांगी कवी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.