काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं यावेळी समोर आलं होतं. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने खंबीरपणे नवऱ्यावर ओढवलेल्या या संकटाला तोंड दिलं. श्रेयसला अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. (Shreyas Talpade Emotional)
श्रेयसच्या आजारपणाचे समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर अभिनेत्याच्या पत्नीने श्रेयस बरा असल्याची पोस्ट चाहत्यांसह शेअर केली होती. त्यानंतर दिप्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून श्रेयस घरी परतला असल्याची पोस्टही शेअर केली. दरम्यान दिप्तीने सदर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे, देवाचे, हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर यांचे आभार मानले.
आजारपणातून बरा झाल्यानंतर आता श्रेयसने कामाला सुरुवात केली आहे. लवकरच तो महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातून कमबॅक करत आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे व गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासंबंधित नुकत्याच झालेल्या इंटरव्ह्यूदरम्यान श्रेयस तळपदेला त्याच्या चाहत्याने लिहिलेलं पात्र वाचून दाखवण्यात आलं. ते ऐकून श्रेयसला अश्रू अनावर झाले.
आणखी वाचा – मुस्लिम धर्माला फॉलो करत नाही सैफ अली खान, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “धर्म मला…”
स्टेजवर येत श्रेयस डोळे पुसत म्हणाला, “माझ्याकडे खरतर शब्दच नाही आहेत. झालं त्याची उजळणी खरंच नको, माझ्याबरोबर जे घडलं ते वैऱ्याबरोबरही घडायला नको. खूप लोकांचं प्रेम, आशीर्वाद, जप, प्रार्थना जे लोक माझ्यासाठी केलं त्याचे ऋण मी या जन्मात तरी फेडू शकत नाही. मी सगळ्यांचा खूप आभारी आहे. तुमचं प्रेम, तुमच्या माझ्याप्रतीच्या भावना पाहता मी खूप खुश आहे. ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट प्रदर्शनाचं ऐकलं तेव्हा मला खूप आनंद झाला. माझ्या आजारपणानंतर हे जेव्हा मला समजलं हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. मी आज पहिल्यांदाच घरातून कामासाठी म्हणून बाहेर पडलो आहे, याआधी एका मुलाखतीसाठी काही वेळासाठी घराबाहेर आलो होतो. माझ्या मनातही धाकधूक होती. आता माझ्या ओळखीचे, लाडके चेहरे पाहून मला खूप बरं वाटत आहे”.