अभिनेत्री क्रांती रेडकर व तिचे पती एनसीबीचे माजी विभागीय संचालक आयआरएस अधिकारी समीर वानखेडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा क्रांतीचा नवरा समीर वानखेडेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबीचे माजी विभागीय संचालक आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरवर तपास करताना ईडीने ही कारवाई केली आहे. (Kranti Redkar On Sameer Wankhede)
अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच तिच्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली पाहायला मिळते. क्रांती नेहमीच तिच्या पतीच्या कामाचं कौतुकही करताना दिसते. पतीवर करण्यात आलेल्या आरोपांनंतर व तपासानंतर आता क्रांतीने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली असल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन क्रांतीने समीर यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. याखाली तिने पतीला पाठबळ देण्यासाठी एक आशयघन पोस्ट लिहिली आहे.
क्रांतीने या पोस्टमध्ये, “ज्यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात, ज्यांच्या मनगटात माय भवानीच्या तलवारीचं बळ, ज्यांच्या रक्तात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्याला भीती कसली आणि कोणाची? त्रास त्यालाच होतो जो सत्याच्या बाजूने लढत असतो. पण जेव्हा पावनखिंड वाचून आपण मोठे झालेलो असतो तेव्हा ही लढाई फारच लहान व क्षुल्लक वाटते. एक जीवन संगिनी म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. तू लढ, तू लढ…विजय तुझाच आहे”, असं तिने म्हटलं आहे.
अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं समोर आलं आहे. ईडीकडून लवकरच वानखेडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचंही समोर आलं आहे. २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.