शरद पोंक्षे यांनी २०१९ मध्ये कर्करोगावर मात करत ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. दरम्यान, या काळात त्यांना मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी कॅन्सरनंतर त्यांना चित्रपटात घेऊन काम करणार असल्याचे वचन दिले होते आणि महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी हा शब्द पाळलादेखील. स्वत शरद पोंक्षे यांनी याबद्दलचा खुलासा केला आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर व अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या सोहळ्याला शरद पोंक्षे, महेश मांजरेकर, श्रेयस तळपदे यांसह अभिनेत्री सुहास जोशी व गौरी इंगावले यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात शरद पोंक्षे यांनी त्यांच्या कॅन्सरच्या काळात महेश मांजरेकर व केदार शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याचे सांगितले.
आणखी वाचा – फुलांची नेमप्लेट, पारंपरिक अंदाज अन्…; मंगेश देसाईंनी घेतलं नवं घर, पत्नी, मुलासह केला नव्या घरात गृहप्रवेश
यावेळी शरद पोंक्षे असं म्हणाले की, “आजारी असताना मला महेश मांजरेकरांचा फोन आला होता. तेव्हा त्याने मला लवकर बरा हो. तू बरा झाल्यानंतर आपल्याला एकत्र चित्रपट करायचा आहे असं म्हटलं होतं. तेव्हा त्याने मला ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील माझ्या भूमिकेविषयीही सांगितलं होतं. आजारपणानंतर माझी शरीरयष्टी, माझे केस व चेहरा हे या चित्रपटातील त्या पात्राला अगदी साजेसं होतं. त्यामुळे या चित्रपटाद्वारे महेशने मला दिलेला शब्द पाळला.”
तसेच यापुढे शरद पोंक्षे यांनी केदार शिंदेचे कौतुक करतही असं म्हटलं की, “केदारनेही मला माझ्या आजारपणानंतर आपल्याला लवकरच एकत्र चित्रपट करायचा आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे आजारपणानंतर लगेच केदारने मला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट दिला आणि त्यानेही मला दिलेला शब्द पाळला.” दरम्यान, शरद पोंक्षे हे लवकरच महेश मांजरेकर यांच्या ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या या भूमिकेसाठी व चित्रपटासाठी आतुर आहेत.