प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश मांजरेकर यांना २०२१ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी अत्यंत धीरानं या कॅन्सरशी लढा दिला आणि त्यावर मात केली. त्यांचा हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी होता. मात्र, या आजारपणातही त्यांनी बिग बॉस मराठी या शोच्या एका प्रोमोचे शूट केलं होतं आणि याचा अनुभव स्वत: महेश मांजरेकरांनी सांगितला आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकतीच त्यांच्या ‘ही अनोखी गाठ’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं महेश मांजरेकर आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या सोहळ्याला अभिनेते शरद पोंक्षे, महेश मांजरेकर व श्रेयस तळपदे हे एकत्र व्यासपीठावर बसलेले पाहून त्यांना एका पत्रकाराने त्यांच्या आजारपणातील लढ्याबद्दल प्रश्न विचारला.
यावर महेश मांजरेकरांनी त्यांच्या कॅन्सरच्या आजारपणाबद्दल व त्या काळात त्यांनी केलेल्या शूटिंगचा अनुभवाबद्दल सांगताना असे म्हटले की, “तुम्ही मरेपर्यंत कायम जीवंत असता. त्यामुळे आपण आपले आयुष्यही अगदी तसंच जगलं पाहिजे. मला कॅन्सर झाल्याचे कळताच मी मरेन हा विचार कधी केलाच नाही. कॅन्सरच्या ऑपरेशननंतर मी ‘बिग बॉस’च्या प्रोमोचे शूट केले होते. तेव्हा मी माझ्या पायाला व पोटाला अक्षरश: पिशव्या (ट्यूबस) बांधून प्रोमोचे शूटिंग केले होते.”
यापुढे त्यांनी श्रेयस तळपदे व शरद पोंक्षे यांचेही कौतुक करत असं म्हटलं की, “शरदने त्याच्या कॅन्सरच्या ऑपरेशननंतर ‘हिमालयाची सावली’ का केलं? असं वाटलं. पण त्याने त्यांच्या हिंमतीवर ते केलं. श्रेयसनेही त्याच्या या आजारपणावर खंबीरपणे मात केली. त्यामुळे त्याच्या आजारपणाबद्दल जेव्हा मला कळलं. तेव्हा मी त्याला काहीही टेन्शन घेऊ नकोस असं म्हटलं होतं.”
आणखी वाचा – असा पार पडला मुग्धा वैशंपायनचा पदवी प्रदान सोहळा, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या भावना, म्हणाली…
‘बिग बॉस मराठी’ ३ चा सीझन सुरू होण्याआधीच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यातून बरे होत त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रोमो शूट केलं होतं. वेदना होत असूनही महेश यांनी चेहऱ्यावर त्या न दाखवता प्रोमो शूट केले आणि त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं.