भोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे हे आजच्या परिस्थितीत फारच कठीण झालं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्यात पण या तुम्ही एखादे प्रसिद्ध वा लोकप्रिय असाल तर ते आणखीनच कठीण. तसेच सध्याच्या या सोशल मीडियाच्या काळात ट्रोलिंग व नकारात्मक कमेंट्समूळे अनेक कलाकार त्यांची भूमिका ठामपणे घेण्यास कचरतात. पण मराठीत काही मोजके कलाकार आहेत, जे भोवताली घडणाऱ्या सामाजिक किंवा राजकिय परिस्थितीवर त्यांची मतं किंवा भाष्य व्यक्त करत असतात. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे.
सध्या दिल्लीच्या सीमांवर शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने जमले आहेत. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर एकत्र आले आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज माध्यमांसह अनेक स्तरातून यावर निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अश्विनीनेही यावर सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीमध्ये पोलिसांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा व्हिडीओ अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला असून याखाली तिने “निषेध.. भारत कृषीप्रधान देश आहे बरं का…” असं लिहिलं आहे. तसेच यापुढे तिने आणखी एक स्टोरी पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “जय जवान व जय किसान हे शाळेत शिकवतात… आता समजते नुसते जय म्हणून जय होत नाही”.

आणखी वाचा – श्वानाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून रितेश देशमुख भडकला, प्रतिक्रिया देत म्हणाला, “तुरुंगात…”
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेक सामाजिक, राजकीय विषयांवर आपली मतं मांडत असते. याआधीही तिने अनकेदा सोशल मीडियाद्वारे तिची मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना दिलेल्या वागणुकीचा अश्विनीने निषेध केला आहे.