झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका आगळ्यावेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका झाली आहे. मालिकेत सुरुवातीपासूनच येणाऱ्या रंजक वळणांमुळे या मालिकेला अल्पावधीतच चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील कलाकारांचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडेने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. (Actress Titeekshaa Tawde Shared BTS Video On Her Instagram)
तितिक्षाने मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणाच्या तयारीचा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील पडद्यामागचे कलाकार एका सीनसाठी किती मेहनत घेतात हे दिसून येत आहे. त्यांच्या मेहनतीचे कौतुक म्हणून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मालिकेचा प्रत्येक भाग रोमांचक बनवण्यासाठी आमच्या संपूर्ण टीमद्वारे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीबद्दल ही कौतुकाची पोस्ट”. त्याचबरोबर यापुढे तिने “आम्ही ४०० भागाच्या पूर्ततेकडे जात आहोत. आमच्यावर असेच प्रेम करत रहा” असंही म्हटलं आहे.
तितिक्षाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पडद्यामागील काही कलाकार वारूळ बनवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये वारुळासाठी कलाकारांकडून घेतली जाणारी मेहनत दिसत आहे. दरम्यान प्रेक्षकांनीही या व्हिडीओखाली कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. “खूप छान, असेच काम करत राहा, तुमच्या मेहनतीला सलाम” अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीदेखील या व्हिडीओखाली “संघर्ष खरा आहे” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, तितिक्षा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक स्टायलिश अंदाजातले फोटो-व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्याचबरोबर मालिकेचे पडद्यामागील काही खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहत असते. दरम्यान तिच्या या व्हिडीओचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.