झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोची व या शोमधील गायकांची आजही चर्चा होताना दिसून येते. या शोमधील छोट्या गायकांनी आपल्या आवाजाने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोची विजेती गायिका कार्तिकी गायकवाड ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. अशातच कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कार्तिकी गायकवाड ही लवकरच आई होणार असून नुकताच तिच्या डोहाळ जेवणाचा जंगी कार्यक्रम पार पडला. पारंपरिक पद्धतीनं कार्तिकीचं डोहाळ जेवण करण्यात आले. या डोहाळे जेवणाचे काही खास फोटो तिने नुकतेच तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कार्तिकीचे आई-वडील, सासू-सासरे व तिचे दोन भाऊ दिसत आहेत. आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने तिने हा खास कार्यक्रम पार पाडला. “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडचा नवरा आहे मोठा उद्योजक, तो नेमकं काय काम करतो?, रोनितला करण्यात आलं होतं सन्मानित कारण…
‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
डोहाळ जेवणासाठी कार्तिकीने या खास कार्यक्रमासाठी हिरव्या रंगाची जरीची सुंदर साडी नेसली होती. तर तिचा नवरा रोहित पिसे हा पठाणी शेरवानीमध्ये दिसला. कार्तिकीने या खास सोहळ्यासाठी खास पारंपरिक दागिने परिधान केले होते. आई होणार असल्याच्या खुशखबरमुळे कार्तिकीच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. दरम्यान, कार्तिकी आई होणार असल्याची खुशखबर समोर येताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.