झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीला गाण्याचा वसा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड स्वत: उत्तम गायक व संगीतकार आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत गायिकेने आपल्या आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
आपल्या सुमधुर आवाजामुळे कायमच चर्चेत असणारी गायिका नुकतीच एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे कार्तिकी लवकरच आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला असून कार्तिकी आई होणार असल्याची खुशखबर तिने सर्वांबरोबर शेअर केली आहे. नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत हा डोहाळ जेवणाचा खास कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी त्यांच्या खास लुकने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
१० डिसेंबर २०२० रोजी कार्तिकी गायकवाडचं लग्न झालं होतं. रोनित पिसे असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित हा पेशाने मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यावसाय आहे. रोनित हा कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राचाच मुलगा आहे. रोनित पिसे हा व्यावसायिक असला तरीही रोनितला संगीताची विशेष आवड आहे आणि तो एक उत्तम तबलावादकदेखील आहे.
काही दिवसांपूर्वी रोनितचा ‘Entrepreneurs Today’ या आंतरराष्ट्रीय मॅगझीनच्या कव्हर पेजवर फोटो झळकला होता. तेव्हा कार्तिकीने नवऱ्याचे कौतुक करत त्याच्याविषयीची पोस्ट शेअर केली होती. “मनापासून अभिनंदन. तुझी अशीच प्रगती होत राहो. मी कायम तुझ्याबरोबर आहे”, असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या नवऱ्याचं अभिनंदन केलं होतं.
कार्तिकीच्या डोहाळ जेवणाच्या व्हायरल व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला आई होणार असल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, लग्नाच्या ४ वर्षांनी कार्तिकी गायकवाड आई होणार आहे. कार्तिकीला सातवा महिना असून मे महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे.