बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोविंदा मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदा यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी शिवसेनेकडून नवीन चेहरा म्हणून गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांकडून त्यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अभिनेते अमोल कोल्हे यांनीही गोविंदाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “कोणत्याही कलाकाराचा कधी अपमान करु नये. एखाद्या कलाकाराचा अपमान म्हणजे पूर्ण सिनेसृष्टीचा अपमान असतो.”
अमोल कोल्हे यांनी एकनाथ शिंदेंचा हाच व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे साहेब आपल्या भावना अतिशय स्तुत्य आहेत. कलाकार हा आपल्या कलेने समाजाला प्रबोधन करणारा, समाजाला आरसा दाखवणारा माणूस असतो. परंतू आमच्या भागातील पूर्वी आपल्याच पक्षात असलेले व सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत नट म्हणून हिणवतात”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्या कलेच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत शिवशंभू विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. केवळ आकस म्हणून मला ‘नट’ म्हणून हिणवने योग्य नाही. हे कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे.” दरम्यान, या पोस्टद्वारे अमोल कोल्हेंनी या पोस्टद्वारे शिवाजी आढळराव पाटील यांना टोला लागावला आहे.