‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’सारख्या चित्रपटातून मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारे नागराज मंजुळे आता ओटीटी विश्वात एक रंजक सीरिज घेऊन येत आहेत. नागराज मंजुळेंची यांची पहिली वहिली वेब सीरिज ‘मटका किंग’ ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओने या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे.
‘मटका किंग’ या शीर्षक भूमिकेत अभिनेता विजय वर्मा असणार हे ॲमेझॉन प्राईम व्हिडीओकडून याआधीच जाहीर करण्यात आले होते. अशातच आता विजयसह या सीरिजमध्ये इतर कोण कलाकार असतील हेही समोर आले आहे. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकर या सीरिजचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. सई आणि नागराज पहिल्यांदाच या सीरिजसाठी एकत्र आले असून सईसह अभिनेता सिद्धार्थ जाधवही या सीरिजमध्ये असणार आहे.
आणखी वाचा – लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?
सई व सिद्धार्थ या कलाकारांसह क्रितिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, भुपेंद्र सिंह जडावत हे कलाकारही ‘मटका किंग’मध्ये दिसणार आहेत. ‘मटका किंग’ची निर्मिती सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, आशिष आर्यन आणि अश्विनी सिधवानी यांनी रॉय कपूर फिल्म्स अंतर्गत केली आहे. तर नागराज आणि अभय कोरान्ने यांनी ‘मटका किंग’च्या लिखाणाची जबाबदारी निभावली.
वेगळ्या विषयाच्या धाटणीसाठी ओळखले जाणारे नागराज मंजुळे आता या सीरिजमधून प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार? हे पाहणे म्हणजे समस्त प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणार आहे. त्यामुळे या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्कीच. दरम्यान, या सीरिजच्या प्रदर्शनाबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नसली तरी अनेकजण ‘मटका किंग’च्या प्रतीक्षेत आहेत.