आज १९ फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरण आहे. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच शिवजयंतीचे औचित्य साधत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर रितेशने दिग्दर्शक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शिवजयंती २०२४ च्या शुभमुहूर्तावर रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे आणि या चित्रपटाचे नाव ‘राजा शिवाजी’ असं आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. ‘जिओ स्टुडिओज’ व ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे. तर ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. तसेच या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे.
रितेशने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याच्या भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा तो आशेचा एक महासूर्य आहे.”
आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; वरुण धवन लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सीमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे ‘राजा शिवाजी’”
दरम्यान, रितेशने शेअर केलेल्या या पोस्टरला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच वर्षाव केला आहे. तर अनेकांनी या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवली आहे. त्याचबरोबर रितेशच्या या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.