आपल्या दमदार अभिनयाने व साध्या राहणीमानाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत कायम चर्चेत राहणारं एक नाव म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करून नानांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. साधं राहणीमान असाध्य दर्जाचा अभिनय ही नाना पाटेकर यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. नाना पाटेकर यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी काही किस्से हे जगजाहीर आहेत. अशातच नाना पाटेकरांनी त्यांचा व ऋषी कपूर यांच्याबरोबरचा मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.
उदय निरगुडकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे. नानांना इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांबद्दल विचारले असता ते असं म्हणाले की, “ऋषी खूप चांगला माणूस होता, तो अनेकदा माझ्या घरी यायचा. एकेदिवशी ऋषीला माझ्या घरी यायचे होते म्हणून त्याने मला विचारले. तेव्हा मी ऋषी व त्याची पत्नी (नीतू कपूर) यांना माझ्या घरी जेवायला बोलावले. मला त्याने तुझ्याकडे दारू आहे का असं विचारलं पण ती माझ्याकडे नव्हती. त्यामुळे ऋषी येताना त्याची दारूची बाटली घेऊन आला. पण त्याच्याबरोबर नीतू आली नव्हती. त्यावर मी तिला फोन करुन बोललो. की यापुढे मला कधी फोन करु नकोस. मग एक तासाने तीदेखील घरी आली.”
आणखी वाचा – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ व ‘ थ्री इडियट्स’साठी शाहरुख खान होता पहिली पसंती पण…; अभिनेत्यानेच केला खुलासा
यापुढे ते असं म्हणाले की, “नीतूने खूप आवडीने खीमा-पाव खाल्ला. ऋषीने आधी खायला नाटकं केली पण नंतर पाच पाव आणि तीन वाट्या किमा खाल्ला. तेव्हा मला त्याने अभिनय सोडून हॉटेल सुरू करण्याचा सल्लादेखील दिला. मग नंतर तो अमेरिकेला गेला. त्याकाळात आमच्यात फोनवर संवाद व्हायचा तेव्हा तो माझ्या हातचा खीमा पाव खायची इच्छा व्यक्त करायचा. मी कधी येऊ? तु खीमा बनव. मला तुझ्या हातचा किमा खायचा आहे. पण हे पुढे कधी साध्य झालंच नाही आणि त्याची खीमा पाव खायची इच्छा राहूनच गेली.”
आणखी वाचा – कोणी घेतलं फार्महाऊस तर कोणी घेतलं मुंबईत घर; २०२३मध्ये ‘या’ मराठी कलाकरांची झाली स्वप्नपूर्ती
नाना पाटेकर व ऋषी कपूर यांची ‘हम दोनो’ या चित्रपटामुळे चांगलीच मैत्री झाली होती. पुढे त्यांची ही मैत्री केवळ ऑनस्क्रीन न राहता वैयक्तिक आयुष्यातदेखील ते खूप चांगले मित्र झाले आणि त्यांचा हा किस्सा त्यांच्या मैत्रीचीच साक्ष देतो. दरम्यान, नाना पाटेकर यांचा नुकताच ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट येऊन गेला. लवकरच त्यांचा ‘ओले आले’ हा मराठी चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या नवीन वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.