मावळत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण आपल्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटना, प्रसंगे यांची उजळणी करत असतात. अशीच काही मराठी कलाकारांची उजळणी आपण करणार आहोत. २०२३ हे वर्ष मराठीतील अनेक कलाकारांसाठी लाभदायी ठरले. २०२३ या वर्षात कुणी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. यंदाच्या वर्षात कुणीनवीन गाडी घेतली तर कुणी नवीन घर घेतले आणि यात नवीन घर घेणाऱ्या कलाकारांची बरीच मोठी यादी आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार ज्यांची यंदाच्या वर्षी त्यांची नवीन घर घेण्याची स्वप्नपूर्ती झाली.
(१) प्राजक्ता माळी : अभिनेत्री प्राजक्ता माळीने कर्जतमध्ये स्वतःचं फार्म हाऊस घेतलं आहे. प्राजक्ताचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या कुशीत आहे. ३ बेडरूम्स, हॉल, किचन, स्विमिंगपूल असं तिचं आलिशान फार्महाऊस आहे. तिच्या या नवीन घराचे नाव ‘प्राजक्तकुंज’ असं आहे.
(२) सई ताम्हणकर : बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करत सई ताम्हणकरने तिचं नवीन घर खरेदी केलं आहे. २०२३ या नवीन वर्षात सई खऱ्या अर्थाने मुंबईकर झाली आहे. मुंबईत तिने स्वतःचं पहिलं घर घेतलं आहे. मुंबईत घर घेतल्यानंतर तिने गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नवीन घराचे नाव ‘द इलिवेन्थ प्लेस’ असं आहे.
(३) धनश्री काडगावकर : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. हिनेदेखील २०२३ या वर्षात नवं घर घेतलं आहे. अभिनेत्रीने गणेशोत्सवादरम्यान नवीन घर खरेदी केलं.
(४) हृता दुर्गुळे : हृता दुर्गुळेसाठी २०२३ हे वर्ष खूपच खास होतं. या वर्षात तिने नवीन घर घेतलं आहे. नव्या घरातील पतीबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना घराची गुडन्यूज दिली.
(५) अक्षय केळकर : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकरसाठी हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो ‘बिग बॉस मराठी ४’चे विजेतेपद पटकावले तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याने म्हाडाचे घर घेतले. हे घर घेतल्यानंतर अक्षयने एक खास पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
(६) पृथ्वीक प्रताप : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर म्हणजे पृथ्वीक प्रताप. काही दिवसांपूर्वीचं त्याचं मुंबईत हक्काचं घर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेत्याला म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून खास फोटो शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
(७) प्रसाद खांडेकर : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील आणखी एक अभिनेता, लेखक व दिग्दर्शक म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादसाठी २०२३ हे वर्ष अगदीच खास होते. याचवर्षी त्याचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला आणि याच वर्षात त्यांनी स्वत:च्या हक्काचं घरदेखील घेतलं.
(८) ऋतुजा बागवे : अभिनेत्री ऋतुजा बागवेसाठी २०२३ हे वर्ष अधिकच खास होते. नुकताच तिची मुख्य भूमिका असलेला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तर याच वर्षी तिने ठाण्यात तिच्या स्वप्नातले नवीन घरही घेतले. स्वकष्टातून घर खरेदी केल्यामुळे ऋतुजा बागवेसाठी हे घर खूप खास असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली.
(९) मयूरी वाघ : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. मयुरीने नुकतंच तिच्या स्वप्नातील नवीन घर खरेदी केलं आहे. गृहप्रवेश व वास्तुशांती पुजेचे काही फोटो शेअर करत “माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं.” असं कॅप्शन दिलं.
(१०) केतकी माटेगावकर : लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरनेदेखील यंदाच्या वर्षी स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं आहे. १८व्या मजल्यावर तिने तिचं नवीन घर घेतलं आहे.