ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी त्याच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने साऱ्या सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. रवींद्र यांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांनंतर त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक हे पुस्तक प्रदर्शित केले. या पुस्तकात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल लिहिलं आहे. यावेळी त्यांनी रवींद्र यांच्या बाबतचे अनेक किस्सेही सांगितले आहेत. (Ravindra Mahajani Incident)
रवींद्र महाजनी त्यांच्या पत्नीवर संशय घेत असल्याचा खुलासाही अभिनेत्याच्या पत्नीने या पुस्तकाद्वारे केला आहे. या दरम्यानचा किस्सा सांगत त्यांनी लिहिलं आहे की, “अलीकडे रवी कोल्हापूरच्या त्याच्या चाहत्याबद्दल संशय घेऊन मला मारू लागला होता. यावेळी इतक्या विचित्र घटनांनी मी सुन्न होऊन जायची. काय करावं, मला सुचेनासं होई. मनात खूप विचार येत. एक मात्र खरं, माणसाच्या दुःखाची नोंद कुणी फार घेत नाही. पण ज्यांचा दुरान्वेयही काही संबंध नाही, ते दोष द्यायला मात्र अगदी पुढे असतात. कधीकधी सगळं असह्य व्हायचं. मी एकटी असायची तेव्हा गच्चीवर जाऊन आक्रोश करायची. मी खूप भोगलं आहे. या साऱ्या काळात रवीच्या घरचे, माझ्या घरचे, मित्रमैत्रिणी सगळे माझ्या बाजूनं होते. कारण त्यांनी आमचा संसार सुरुवातीपासून पाहिला होता.”
माधवी यांनी एक किस्सा सांगत लिहिलं आहे की, “एकदा तर रवीनं कहरच केला. मला म्हणाला, ‘मी झाडाच्या मागे लपून पहात होतो. तू रस्त्यावरच्या पुरुषांना खाणाखुणा करुन वरती बोलवत होतीस.’ त्या वेळी घरामधे सासूबाई, दोन मुलं, कामवाली, तो स्वतः सर्वजण रहात होते. असले आरोप ऐकून तर मी फार संतप्त व दुःखी होत असे. त्याबद्दल मी एकदा डॉक्टरांशी बोलले असता त्यांनी सांगितले की, ‘या प्रकारास हॅल्यूसिनेशन म्हणतात. खरोखरच अशा लोकांना तसे भास होतात.”
यापुढे त्या म्हणाल्या, “मी मैत्रिणींना पूर्वी मोठ्या अभिमानाने सांगत असे की, रवीचा माझ्यावर पुरेपूर विश्वास आहे. त्याने मला प्रत्यक्ष एखाद्या पुरुषाबरोबर पाहिलं तरी त्याला ते खरं वाटणार नाही. तो म्हणेल माझ्याच डोळ्यांत काहीतरी बिघाड झाला म्हणून मला असे दिसत आहे. कधीकधी त्याच्या मित्रांना ड्रिंक घ्यायला जागा नसायची. रवी शूटिंगसाठी बाहेर गेलेला असे. अशा वेळी क्वचित कधीतरी त्यांनी मला असेदेखील विचारले आहे की, वहिनी आम्ही थोडा वेळ तुमच्या हॉलमधे बसतो. घरी सासूबाई, रश्मी असायची. ते यायचे आणि त्यांचे काम झाले की निघून जायचे. तेव्हाही कधी रवीला असे वाटले नाही की, मी घरात नसताना माझ्या मित्रांनी येता कामा नये. पण अलीकडे रवी माझ्यावर फारच संशय घेऊ लागला होता.”