मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक व त्याची पत्नी मंजिरी ओक ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. प्रसाद ओक हा प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शक म्हणून गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. त्याच्या या सिनेसृष्टीतील प्रवासात त्याची पत्नी मंजिरी ओक त्याचा व्यवसाय सांभाळत त्याच्या कामाला नेहमीच हातभार लावताना दिसते. तसेच ही जोडी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. (Prasad Oak Birthday)
चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी प्रसाद व मंजिरी नेहमीच मजेशीर व्हिडीओ बनवून चाहत्यांसह शेअर करत असतात. प्रसाद व मंजिरीने एकमेकांना साथ देत सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. आज प्रसाद ओकचा वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मंजिरी ओकने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मंजिरीने नवऱ्यासाठी गमतीशीर कॅप्शन देत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मंजिरीने प्रसादबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंजिरीच्या तोंडावर मास्क पाहायला मिळत आहे. कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “प्रसाद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की, मी अशी वागेन. गप्प बसेन. तुला बोलू देई. मी फक्त ऐकेन. तर जागा हो. फोटो आहे तो, मी फक्त फोटो मध्येच गप्प बसू शकते. तुला पर्याय नाही. माफ कर, आज चांगलं बोलायचं असतं ना?, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. वाढदिवसाच्या शुभेच्छा.” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
मंजिरीने प्रसादला दिलेल्या या हटके शुभेच्छा पाहून अनेकांनी या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत, “भारतीय बायकोचे हक्काचे विधान देऊन शुभेच्छा दिल्या आहेत” असं म्हणत मंजिरीने दिलेल्या शुभेच्छांचं कौतुक केलं आहे. प्रसाद जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा मंजिरीने त्याची प्रत्येक पावली साथ दिली असल्याचं साऱ्यांनाच माहित आहे. मंजिरीने प्रसादसह ‘हिरकणी’ व ‘चंद्रमुखी’ या दोन्ही चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.