सुप्रिसद्ध दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अचानक समोर आलेल्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. रवींद्र यांच्या निधनाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या जवळ उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना चाहत्यांनी बरंच ट्रोल केलं. त्यानंतर रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबाबत त्यांनी लिहिलेल्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात बरेच मुद्दे मांडले आहेत. यावेळी रवींद्र महाजनी यांच्या पत्नीने त्यांच्या सासरच्या मंडळींबाबतही भाष्य केलेलं पाहायला मिळालं. (Ravindra Mahajani Wife Incident)
रवींद्र महाजनी यांच्या पत्नीने त्यांच्या पुस्तकात त्यांच्या दीर व जाऊबाईंबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर दीर व जाऊ यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल व त्रासाबद्दल त्यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. हा किस्सा सांगत त्या म्हणाल्या की, “आमचं लग्न झालं तेव्हा दीर-जाऊ चांगल्या पोस्टवर होते. दोघेही नोकरी करणारे. लग्न झालं तेव्हा आम्ही दोघेही काही कमवत नव्हतो. शिवाय माझ्या थोरल्या जाऊबाई व सासूबाई यांचं फारसं पटायचं नाही. दोघींची खडाजंगी होत असे. त्यामुळे असेल किंवा आम्हा दोघांचे काही उत्पन्न नाही तर आता आमचाही खर्च त्यांच्यावर पडेल असे वाटल्यामुळे असेल”.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, “आमचं लग्न झाल्यावर थोड्याच दिवसांनी मोठ्या दीरांनी पुण्याला स्वतंत्र बिऱ्हाड केलं. त्यानंतर दीरांनी आम्हाला पुष्कळ त्रास दिला. घरी अचानक यायचे. आल्यानंतर सतत कुणा ना कुणाला फोन करत बसायचे. महिन्याचे दोन हजार रुपये टेलिफोनचे बिल यायचे. सासूबाई याबाबत काही म्हणाल्या, तर ते म्हणायचे, माझ्या वडिलांचा फोन आहे, माझा हक्क आहे. पण बिल तर आम्हालाच भरायला लागायचं. काही दिवसांनी आम्ही रवीच्या नावाने वेगळाच फोन घेतला व हा प्रश्न कालांतराने मिटला”.
यापुढे त्यांनी लिहिलं आहे की, “मी मात्र नेहमी आपलं घरातलं माणूस म्हणून त्यांच्याशी नीट वागायचे. ते आले की लगेच त्यांची गाडी मी आधी नोकराकडून धुवून घ्यायचे. ते बाहेर निघाले तर जेवायला येताय ना? या असंही सांगायचे. त्यातही गंमत अशी की, जेवायला येईन असे ते मला म्हणायचे, तेव्हा ते यायचे नाहीत आणि येणार नाही म्हणाले, की हमखास जेवायला यायचे. पण मी कशाचाच बाऊ केला नाही. असं जाणवायचं की, त्यांचा राग रवीवर होता, माझ्यावर नव्हता. ते माझ्याशी बोलायचे नाहीत पण रागही करायचे नाहीत” असंही त्या म्हणाल्या.