विवाहानंतर संसाराला सुरुवात करण्यापूर्वी देवकार्य करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनेक जोडपे विवाहानंतर आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊन संसाराला लागतात. त्यातही देवाचरणी आपली सेवा करता आली तर त्याहून मोठा आनंद नाही आणि देवाचरणी अशीच सेवा करण्याची संधी एका गायक-गायिका जोडप्याला मिळाली. ते जोडपे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ या लोकप्रिय सिंगिंग शोमधून ही जोडी अवघ्या महाराष्ट्रात पोहोचली.
मुग्धा-प्रथमेश त्यांच्या गायनशैलीने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहेत. त्यांचे गाण्याचे अनेक व्हिडीओ ते सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून या फोटोंद्वारे त्यांनी नृसिंहवाडी येथील श्रीदत्त महाराजांच्या चरणी आलेल्या गायनसेवेचा अनुभव व्यक्त केला आहे.
प्रथमेश-मुग्धाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचे काही खास फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “सांगलीला चितळे बंधू यांच्या सुरश्री संगीत महोत्सवात आमचं गाणं होतं. ते झाल्यावर दुसऱ्या दिवशी आमच्या प्रचंड लाडक्या श्रद्धास्थानापैकी एक श्री नृसिंहवाडी येथे श्रीदत्त महाराजांच्या कृपेने लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला. नेहमीप्रमाणेच दक्षिणद्वाराशी गायनसेवाही अतिशय प्रसन्न वातावरणात अप्रतिम दर्शन घडलं. दक्षिणद्वाराशी गायनसेवा झाल्यावर डोळे उघडताच समोर श्री संकेश्वर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांचं दर्शन झालं. हा दुग्ध शर्करा योगच.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “त्याच दिवशी संध्याकाळी आयुष्यात पहिल्यांदा श्री क्षेत्र औदुंबर येथे जाऊन दर्शनाचा आणि तिथेही महाराजांसमोर बसून गायनसेवेचा योग आला. महाराजांना गायनसेवा अतिप्रिय आहे आणि महाराज ही सेवा नेहमी आमच्याकडून करुन घेतात हे आमचं परमभाग्य आहे. एकाच दिवशी श्री मनोहर पादुका आणि श्री विमल पादुकांच्या दर्शनाचा लाभ होणं व दोन्ही स्थानी महाराजांजवळ बसून गायनसेवा करायला मिळणं हे श्री महाराजांच्या कृपेशिवाय शक्यच नाही.”
दरम्यान, प्रथमेश-मुग्धा यांनी शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी “गुरुदत्त चरणी आपली सेवा अर्पण करायला भाग्यचं लागतं, तुम्ही दोघेही खूप कमाल गाता, तुम्हाला कायम असेच गुरू आशीर्वाद मिळत राहोत” असं म्हणत त्यांच्या गायनशैलीचे कौतुक केलं आहे.