ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील अपार्टमेंटमध्ये ते एकटेच राहत होते. दोन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर महाजनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याच्यावर बरीच टीका करण्यात आली. आता त्यांच्या मृत्यू मागचं खरं कारण समोर आलं आहे.
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये गश्मीरने रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूबाबत आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नात्याविषयी अनेक खुलासे केले. यावेळी वडिलांच्या मृत्यू मागचं कारण त्याने सांगितलं. तो म्हणाला, “त्यांचं निधन कार्डिअॅक अरेस्टने झालं. डॉक्टरांनी मला सांगितलं की, तुम्ही तिथे असता तरी काहीच करु शकला नसता”. जवळपास दीड महिन्यांनी त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे.
आणखी वाचा – “माझ्या वडिलांकडे पिस्तुल होतं आणि…”, गश्मीर महाजनीचा वडिलांबाबत मोठा खुलासा, म्हणाला, “पोलिसांनी मला…”
जवळपास २० वर्ष रवींद्र महाजनी एकटे राहत होते. गेली तीन वर्ष तर कुटुंबियांशी त्यांचा कोणत्याच प्रकारचा संपर्क नव्हता. शिवाय निधनाच्या दहा दिवसांपूर्वी ते जीमलाही गेले असल्याचं गश्मीरने सांगितलं. एक वेगळ्या प्रकारे स्वतःचं आयुष्य जगण्याची त्यांची पद्धत होती. गश्मीर १५ वर्षांचा असतानाच रवींद्र महाजनी कुटुंबियांपासून वेगळं राहू लागले.
गश्मीर वडिलांबरोबर असलेल्या नात्याविषयी म्हणाला, “आमचं नातं एकतर्फी होतं. जेव्हा त्यांना आम्हाला भेटायची इच्छा व्हायची तेव्हा ते घरी यायचे. एकटं राहण्याची इच्छा झाली की, ते घरामधून निघून जायचे. ते मुडी होते. त्यांची कामं इतरांनी कोणी केली की त्यांना राग यायचा. त्यांना ते आवडत नव्हतं. अजूनही ते स्वतःचं जेवण, घरातील साफसफाई ते स्वतः करायचे”. गश्मीरने स्वतःची बाजू मांडत वडिलांबरोबरच्या नात्याबाबत खुलासे केले आहेत.