कोकणातील शिमगा मुंबईतील सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयाजवळचा हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी शिमग्यासाठी त्याचे पाय आपोआप आपल्या गावाकडे वळतात. मग तो सामान्य माणूस असो वा कुणी मोठा सेलिब्रिटी. गावच्या देवाच्या पालखीनिमित्त प्रत्येक कोकणी माणूस हा देवाच्या ओढीने गावी जातोच.
सध्या कोकणात शिमग्याचा सण साजरा होत असून अनेक चाकरमानी मुंबईतून कोकणात पालखी सोहळा अनुभवण्यासाठी गेले आहेत. आपल्या व्यस्त कामातून वेळात वेळ काढून शिमग्यानिमित्त साजरा होणारा पालखीचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे हा नयनरम्य सोहळा अनुभवण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचेही पाय कोकणातल्या आपल्या गावी वळले आहेत.
रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियावरद्वारे गावच्या पालखी सोहळ्याची नयनरम्य दृश्ये चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत. “माझ्या कोकणातील गावाची पालखी” असं म्हणत त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रामस्थ मंडळी देवाच्या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन आनंदाने नाचवत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये सनई आणि बाज्याचा वाजपही होत असलेला ऐकू येत आहे.
आणखी वाचा – “हिमाचलमधून निवडणूक लढणार नाही”, अभिनेत्री कंगना रणौतचे जुने ट्विट व्हायरल, म्हणाली, “काम करुन राणी बनायचं…”
दरम्यान, अलीकडेच शूटिंगमधून वेळात वेळ काढून रवी जाधव त्यांच्या गावच्या घरी पोहोचले आहेत. रत्नागिरीत संगमेश्वर तालुक्यातील कासे हे रवी जाधव यांचे गाव असून सध्या ते गावच्या शिमगोस्तवाचा आनंद घेत आहेत. नुकताच त्यांचा ‘मै अटल हूं’ हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला असून त्यांच्या आगामी ‘बाल शिवाजी’ या चित्रपटाची साऱ्यांणा उत्सुकता लागून राहिली आहे.