आपली परखड भूमिका आणि रोखठोक वक्तव्य यामुळे एक नाव कायमच चर्चेत राहणारं नाव म्हणजे शरद पोंक्षे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे हे नाव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आले होते पण या चर्चेचं कारण होता त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे. शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे लवकरच सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. याबाबत शरद पोंक्षे यांनी नुकतीच सोशल एक खास पोस्ट शेअर करत घोषणा केली होती. शरद पोंक्षेंच्या याच पोस्टवर अभिनेते संजय मोने यांनी कमेंट केली आहे.
संजय मोनेंनी कमेंटमध्ये असं म्हटलं आहे की, “मी त्यात विनाअट काम करतो आहे. कारण शरदने नथुराम गोडसेचे काम करताना आणि असंख्य अडचणीचा सामना करताना कुठल्याही तथाकथित रंगकर्मींकडे “मी व्यक्त होत आहे, मला उचलून धरा” असं कधीही सांगितलं नाही. थोडक्यात नथुराम गोडसे सादर करताना तो (शरद पोंक्षे) महात्मा गांधींचं “एकला चालो रे” हे वचन अवलंबत होता. याहून गंमत काय असणार आहे?”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “व्यक्तिशः मी त्या सगळ्या गोष्टींच्या तत्त्वांशी सहमत नाही. पण मी ना गांधी पाहिलेत, ना मी नथुराम गोडसे पाहिलेत. त्यामुळे न पाहिलेल्या लोकांच्या बाबतीत काही बोलणे हे गैरलागू आहे. शेवटी शरद पोंक्षे हा माझा मित्र आहे आणि त्याच्या मुलाच्या चित्रपटात काम करणं हे माझ्यासाठी एक मैत्रीबंधन आहे”. संजय मोनेंच्या या कमेंटला शरद पोंक्षेंनी उत्तर देत असं म्हटलं आहे की, “व्वा संजय लव्ह यू यार. किती छान व्यक्त होतोस आणि हे ऋण कधीही न विसरता येणारं आहे.”

आणखी वाचा – सायलीची कर्तबगिरी पाहून पूर्णा आजी खुश, भेटवस्तूही दिली अन्…; सुभेदारांची सून म्हणून स्वीकार करणार का?
स्नेहच्या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंनी भावना व्यक्त करताना असं म्हटलं होतं की, “एका नवीन भूमिकेतून तुमच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे मुलाच्या बरोबरीने ही वेगळी भूमिका साकारत आहे. यापूर्वी स्नेहने पाच वर्षं सह-दिग्दर्शक म्हणून काम केले आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मला खात्री आहे, तो ही जबाबदारी उत्तमरित्या पेलेल.”
दरम्यान, स्नेहच्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेलं नाही. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. स्नेह पोंक्षे लिखीत व दिग्दर्शित हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.