सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे ‘ताली’ या वेबसीरिजची. तृतीयपंथी यांवर आधारित असणारी ही वेबसीरिजच सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. सुष्मिता सेन अभिनित या वेबसीरिजमध्ये अनेक मराठमोळे चेहरे पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची बाजूही मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी साकारली. सर्वत्र बोलबाला असणाऱ्या या हिंदी वेबसीरिजच्या अनुभवाबाबत दिग्दर्शक रवी जाधव यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे. (Ravi Jadhav On Taali)
या मुलाखतीदरम्यान सर्वप्रथम त्यांनी सुष्मिता सेनच्या भूमिकेचं कौतुक केलं. रवी जाधव म्हणाले की, “सुष्मिता अतिशय शिस्तप्रिय आहे. शूटिंगच्या दिवसात ती सेटवर नेहमी वेळेस हजर असायची. एखादा सीन जास्त चांगला कसा होईल याकडे तिचा कल असायचा. जेव्हा तिला पुरुषाच्या रूपात दाखवायचं होतं तेव्हा ती दिवस-रात्र छातीला पॅडिंग लावून बसत असायची. अगदी खरोखर पुरुष वाटावा यासाठी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणार सेंटर गार्डही तिने वापरलं. पुरुषासारखा आवाज वाटावा म्हणून वेगवेगळ्या पीचेस मध्ये आवाज रेकॉर्ड करून ती आम्हाला पाठवायची.विशेष म्हणजे तिची एनजीओप्लास्टी झाल्यावर काही दिवसातच तिने डबिंगलाही सुरुवात केली होती”.
त्यांनतर मराठी कलाकारांचं पारडं हे दाक्षिणात्य कलाकारांपेक्षा कमी आहे, यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलं. याबाबत बोलताना रवी जाधव म्हणाले की, “सध्याच्या काळात दाक्षिणात्य कलाकारांना भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या पाठी कोट्यावधी प्रेक्षकांचे पाठबळ असते. त्या बळावरच ते काही कोटींचे मानधन सुद्धा आकारतात. ते इतकं मानधन आकारतात कारण त्यांना आपल्या प्रेक्षकांवर विश्वास असतो की आपले प्रेक्षक आपल्या चित्रपटाला नक्कीच यश मिळवून देतील”.
“अगदी तसंच एखाद्या कलाकाराने सामाजिक राजकीय प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली तर त्यावेळीही त्या कलाकारांना त्यांच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळतो. पण हे चित्र मराठीत दिसत नाही कारण इथे क्वचितच एखादा चित्रपट कोट्यावधी कमावतो. हे चित्र बदलण्यासाठी चित्रपट हिट करणं, त्यासाठी ते चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहणं, त्यापूर्वी चांगले चित्रपट येणं सर्व गोष्टींची गरज आहे. जेव्हा हे वर्तुळ पूर्ण होईल तेव्हाच हे चित्र निश्चितच बदललेलं दिसेल”, असंही रवी जाधव म्हणाले.