येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. अशातच रामायण या गाजलेल्या मालिकेतील राम, लक्ष्मण व सीता हेदेखील अयोध्येत पोहोचले आहेत.
रामायण मालिकेमध्ये श्री रामच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते अरुण गोविल, सीतेच्या भूमिकेत दिसणारी दीपिका चिखलिया व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी हे तिघे राम नगरी अयोध्येमध्ये पोहोचले आहेत. यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका यांनी लाल रंगाची साडी नेसलेली आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे. तर राम-लक्ष्मण म्हणजेच अरुण गोविल व सुनील लहरी हे दोघे पिवळ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये सुनील लहरी यांनी त्यांना प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण न मिळाल्यावर त्यांची नाराजी व्यक्त केली होती. पण आता त्यांना अयोध्या नगरीत पोहोचलेले पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी पुन्हा एकदा आम्हाला राम-लक्ष्मण-सीता यांचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली आहे तर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये ‘जय श्री राम’ अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, अयोध्येमधील या राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी क्रिकेट, राजकारण, मनोरंजन यांसह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे.