मराठी सिनेसृष्टीत अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमधून आपल्या विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लाघवी व मनमिळाऊ अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने. ‘आभाळामाया’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने. त्यांनी अनेक गंभीर तसेच हलके-फुलके विनोद असलेल्या भूमिका अगदी लिलया साकारल्या. सुकन्या मोने या त्यांच्या अभिनयाने जशा परिचित आहेत तशाच त्या त्यांच्या रोखठोक भूमिका व्व जाहीर मतांसाठीदेखील तितक्याच चांगल्या ओळखल्या जातात. मराठी मालिका, मालिकांचे घसरत जाणारे आशय यांसह टीआरपीमुळे मालिकांची वाढलेली शर्यत याबद्दल त्यांनी अनेकदा परखडपणे त्यांचं मत मांडलं आहे.
सुकन्या मोने यांचे पती संजय मोने हेदेखील याच क्षेत्रातील आहे. त्यांच्यात कायमच खास नाते असल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच सुकन्या यांनी त्यांच्या सासूबाईंबद्दल कौतुकाचे उद्गार काढत त्यांचे आभार मानले आहेत. ‘अमृता फिल्म्स’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सासूचे अगदी तोंड भरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुकन्या यांना “तुमचे वैयक्तिक आयुष्य व चित्रपट, मालिकाचे हे ग्लॅमरचे युग यांत समतोल कसा साधलात?” असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा – Video : ‘रामायण’मधील राम, लक्ष्मण, सीता अयोध्येमध्ये पोहोचताच घडला चमत्कार, लोक त्यांनाच देव मानू लागले अन्…
या प्रश्नाचे उत्तर देत सुकन्या मोने यांनी असे म्हटले की, “माझ्या नाशिबाने जसं माझं माहेर आहे. तसंच सासर मला मिळालं. माझ्या माहेरी मला मी करत असलेल्या कामासाठी नेहमीच प्रोत्साहन देण्यात आले. मुंबईत शूटिंग असले की माझ्याबरोबर माझे वडिल शूटिंगला यायचे किंवा बाहेर शूटिंग असले तर आई यायची. असंच वातावरण माझ्या सासरीदेखील आहे. माझे सासू-सासरे दोघेही नाटकात काम करायचे. माझे सासरे उत्तम ज्योतिषी होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला (संजय मोने) वेगळे स्वातंत्र्य आणि मला वेगळं बंधन, असं कधीही त्यांनी केलं नाही. माझ्या सासूबाईंनी तेव्हा मला सांगितलं होतं की, जोपर्यंत मी उभी आहे, तोपर्यंत तू पाहिजे तेवढं काम कर. आणि बोलल्याप्रमाणे वागल्यासुद्धा. नंतर त्यांची प्रकृती खालावली तेव्हा मी माझे काम कमी करुन त्यांच्यासाठी हजर राहीले. आमच्या दोघींमध्ये चांगली आमच्या विचारांची व मतांची चांगली देवाण-घेवाण होत असे.”
यापुढे सुकन्या मोने असं म्हणाल्या की, “आमच्यात इतर सासू-सूनांमध्ये वाद होतात तसे वाद झाले. आमच्यात पण भांडणे झाली. माझ्या आईची व माझी मतं वेगवेगळी आहेत, तर सासू आणि माझी मतं वेगळे असूच शकतात. पण ते वाद कुठपर्यंत न्यायचे आणि कुठे थांबवायचे हे आम्हा दोघींना माहीत होतं. कारण आम्हा दोघींना एकमेकींबद्दल प्रेम होतं आणि आम्हा दोघींना एकमेकींबरोबर राहायचे होतं. आम्हाला आमच्या भांडणांपेक्षा, अबोल्यापेक्षा तो सहवास महत्त्वाचा होता. त्यामुळे आम्ही आमच्यातील वाद हे कधीच सासरे किंवा संजयपर्यंत जाऊ दिले नाहीत. कारण आम्हाला आमचं घर महत्त्वाचे होते आणि एकत्र राहणे महत्त्वाचे होतं.”