सिनेसृष्टीत बरीच अशी कलाकार मंडळी असतात ज्यांना कित्येकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. बरेचदा ही कलाकार मंडळी ट्रोलर्सच्या कमेंटवर सडेतोड उत्तर देतात तर काहीवेळा ते दुर्लक्ष करताना दिसतात. बरीच कलाकार मंडळी बॉडी शेमिंगमुळे ट्रोल होताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या बॉडी शेमिंगबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘रमा राघव’ मालिकेतील ऐश्वर्या शेटे. (Aishwarya Shete On Body Shaming)
‘रमा राघव’ या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या शेटे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील रमा व राघव यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेमुळे रमा सध्या प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. याआधी अभिनेत्री ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. सहकलाकार ते मुख्य भूमिका हा अभिनेत्रीचा प्रवास काही सोप्पा नव्हता. सकाळ अनप्लग्डच्या पॉडकास्टमध्ये तिने या प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “बहिणीच्या शिक्षणासाठी आम्ही भिवंडीहून कल्याणला आलो. मात्र तिथे माझे नवीन मित्र बनत नव्हते. मी ‘पछाडलेला’ चित्रपटातील वंदना गुप्ते यांची नक्कल घरच्या आरशासमोर करायचे. हे आईने पाहिलं आणि तिनेच मला या क्षेत्रात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. सुरुवातीच्या काळात माझं वजन ८५ किलो होतं. जाड दिसत असल्याने मी कायम नर्वस असायचे. पण मला अनेकांनी प्रोत्साहन दिलं आणि मी स्वतःकडे विशेष लक्ष दिलं. रमा ही व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर रमा या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी मला सहज स्वीकारलं नाही. ही अभिनेत्री, ही अभिनेत्री कशी असू शकते? अशा देखील प्रतिक्रिया आल्या”, असंही ती म्हणाली.
ऐश्वर्या पुढे म्हणाली, “तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता पण मी स्वतःला सिद्ध केलं. आता रमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे. सोशल मीडिया ट्रोलिंगला मी आता भाव देत नाही. त्या प्रतिक्रियांमधून स्वतःला सुधारता येतं का, याचा विचार करत पुढे जाते. माझी मुलगी एक दिवस मुख्य भूमिकेत असेल हे माझ्या आईचं स्वप्न होतं. यासाठी धडपडत करत मी आज तिचे स्वप्न मी पूर्ण करू शकले, याचा आनंद आहे” असंही ती म्हणाली.