आज ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सर्वत्र प्रेमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हिंदीसह अनेक मराठी कलाकार आपल्या जोडीदारांबरोबरचे काही खास क्षण शेअर करत त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. अनेकजण त्यांच्या हटके स्टाईलमध्ये आपल्या जोडीदाराबद्दलच्या प्रेमभावना व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी, आपल्या लाघवी अभिनयाने व मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ता कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहत असते आणि तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दलचा एक प्रश्न कायम सतावत असतो तो म्हणजे अभिनेत्रीचं लग्न. प्राजक्ता लग्न कधी करणार? किंवा ती कोणाला डेट करत आहे का? हा प्रश्न तिला कायमच विचारण्यात येतो. यावर स्वत: अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्राजक्ताने तिच्या फार्महाऊसचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करत तिने “यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.” असं म्हटलं आहे. यापुढे तिने “प्रेम करू नका, पण प्रेम व्हा हे ब्रीदवाक्य स्मरणी आहेच.” असंही म्हटलं आहे. त्याचबरोबर यापुढे तिने ‘एकला चलो रे’ असा हॅशटॅगही दिला आहे.
दरम्यान, प्राजक्ताची ही पोस्ट व तिने नुकताच शेअर केलेला तिच्या फार्महाऊसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने कर्जत येथे डोंगराच्या कुशीत घेतलेल्या फार्महाऊसची प्रचंड चर्चा होत असून या व्हिडीओद्वारे तिने तिच्या फार्महाऊसची संपूर्ण झलक पाहायला मिळत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.