महानायक अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीमध्ये दरवर्षी वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी अमिताभ यांनी २७३ कोटी रुपयांची कमाई केली. ही सर्व माहिती सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने समोर आली. बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन या २०२४मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या उमेदवार म्हणून पुन्हा एकदा अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना आपल्या संपत्तीचा संपूर्ण लेखाजोगा भरावा लागतो. या माहितीमध्ये खुद्द जया बच्चन यांच्या करोडोंच्या संपत्तीबाबत माहिती समोर आली आहे. जया यांची एकूण संपत्ती १००१ कोटी रुपये आहे. तसेच अमिताभ यांच्याकडे १२.३ लाख रुपये व जया यांच्याकडे ५७ हजार रुपये नगद आहे. जया आतापर्यंत चार वेळा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत आता पाचव्यांदा त्यांची खासदार पदासाठी वर्णी लागण्याचे संकेत आहेत. (jaya bachchan property)
जया यांना चित्रपटसृष्टीमध्ये ६० वर्ष पूर्ण झाली असून वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकले. सध्या त्यांचे वय ७५ वर्ष आहे. जया या आजही बॉलिवूडमध्ये आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ मध्ये कमालीचे काम केले आहे. या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेवरुन जया यांना काही प्रमाणात ट्रोलदेखील केले गेले. सध्या काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असून आगामी काळात त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतात. चित्रपटांमध्ये काम करत असताना जया यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणामध्येही त्यांना घवघवीत यश मिळालं. आता पुन्हा एकदा खासदारकीसाठी त्या उभ्या राहत आहेत.
अर्ज भरायच्या आधी शपथ पत्र जाहीर करताना त्यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांच्याकडे एकूण १००१ कोटी रुपयांची संपत्ती असून यामध्ये ५१ लाख रुपयांची घडयाळे, ९ लाख रुपयांचं पेन, १२ आलिशान गाड्या आहेत. मालमत्तेमध्ये अमिताभ व जया यांच्याकडे मिळून भोपाळ,दिल्ली, नोएडा,पुणे, गांधीनगर व मुंबईव्यतिरिक्त फ्रांस ब्रॉगोन प्लेगसमध्ये ३,१७५ स्क्वेअर मीटर रहिवासी मालमत्ता आहे. तसेच लखनऊ येथील काकोरीमध्ये २०२ कोटी रुपये किंमतीची शेत जमीन आहे.
जया बच्चन यांच्याबरोबर अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांची मालमत्ता देखील समोर आली आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये हेमा यांनी आपल्या संपत्तीचा लेखाजोगा सादर केला होता. यामध्ये त्यांची एकूण संपत्ती २४९ कोटी रुपये असल्याचे सादर केले गेले. हेमा मालिनी या २०२० मध्ये राजकुमार राव व राकुल प्रीत यांच्यासमवेत ‘शिमला मिर्ची’ या चित्रपटात दिसल्या होत्या.