Bigg Boss 17 Latest News : देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचा सोशल मीडियावरील वावर हा बऱ्यापैकी मोठा आहे. अनेकदा प्रियांका तिच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. बरेचदा ती तिचा पती निक जोनास आणि त्यांची एक वर्षाची मुलगी मालती मेरी चोप्रा यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत असते. त्यानंतर आता, प्रियांकाने तिची चुलत बहीण मन्नारा चोप्रा साठी एक स्टोरी पोस्ट केली आहे. मन्नारा चोप्राने नुकताच ‘बिग बॉस १७’ मध्ये प्रवेश केला आहे, त्यानिमित्त प्रियांकाने तिचे अभिनंदन केले आहे.
शुक्रवारी सकाळी प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिची चुलत बहीण मन्नारा चोप्राबरोबरचा एक आठवणीतला फोटो पोस्ट केला आहे. प्रियांकाने शेअर केलेला मन्नाराबरोबरचा हा फोटो २००० सालचा आहे. या फोटोत प्रियांका मन्नाराबरोबर उभी राहून पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांकाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा सुंदर मुकूट पाहायला मिळत आहे. या फोटोला “गुड लक लिटिल वन”, असं कॅप्शन अभिनेत्रीने दिलं आहे.
डोक्यावर मुकुट घातलेली प्रियांका अतिशय सुंदर दिसत असून पांढऱ्या रंगाच्या पोशाखात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तर यावेळी फोटोमध्ये मन्नारा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत सुंदर फोटो शेअर करत प्रियांकाने तिच्या चुलत बहिणीला पाठिंबा दर्शिवला आहे. आणि तिला ‘बिग बॉस १७’ साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मन्नारा चोप्रा ही प्रियांकाची चुलत बहीण आहे. मन्नाराची आई कामिनी चोप्रा हांडा प्रियांकाच्या वडिलांची बहीण आहे. मन्नारा २०१८ मध्ये जोधपूरमध्ये प्रियांका आणि निक जोनासच्या लग्नात सहभागी झाली होती. तिने विशेषतः साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मन्नारा ही प्रियांकाची बहीण असल्याने चाहत्यांना ‘बिग बॉस’च्या घरात तिच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत.