मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि देशाचे नागरीक म्हणून प्रत्येकासाठीच ही निंदनीय बाब आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना आजही महिला कुठल्याही शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून येते. वर्तमानपत्र, टीव्हीसारख्या अनेक माध्यमांत आजही महिला अत्याचार व त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरच असल्याचे दिसून येते. या गोष्टी सर्वसामान्य महिलांसोबतच घडतात असे काही नाही. सिने इंडस्ट्रीत वावरणाऱ्या नावाजलेल्या अभिनेत्रींनासुद्धा बरेचदा अशा प्रकारांना सामोरे जावे लागते.
अभिनेत्री प्रिया बापटने तिच्याबरोबर घडलेल्या अशाच एका गंभीर प्रकाराबद्दल सांगितले आहे. अभिनेत्री प्रिया बापटने मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच वेब सीरिजच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांचेदेखील तिने भरभरून मनोरंजन केले आहे. आजवर तिने अनेक चित्रपट व वेबसीरिजच्या माध्यमातून सशक्त भूमिका साकारल्या आहेत. पण तिच्या आयुष्यात आहे एक भयंकर घटना घडली होती ज्याबद्दल तिने ‘Hauterr Fly’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
हा भयानक अनुभव सांगताना प्रियाने असं म्हटलं की, “मी शूट संपवून घरी येत होते. माझ्या हातात पिशव्या होत्या आणि मी फोनवर माझ्या एका मित्राबरोबर बोलत चालत होते. माझ्या कानाला फोन आणि हातात काही पिशव्या घेऊन जात होते. तेवढ्यात एक माणूस समोरून आला, त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला. तेव्हा मला माझ्याबरोबर काय घडलं आहे हे समजायला मला तीन सेकंद लागले. तेव्हा मी फक्त तिथे स्तब्ध उभी होते. मला कळतच नव्हतं की नेमकं काय घडलं आहे. मी मागे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता. तो पळून गेला होता. अवघ्या काही क्षणात तो तिथून गायब झाला होता.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “मी घरी गेले, दुर्दैवाने आई घरी नव्हती, बाबा होते. मला कळत नव्हतं की जे घडलं आहे ते बाबांना कसं सांगू. मी सारखी रडत होते, तेव्हा माझ्या बाबांनी विचारलं की काय झालं? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असहय्य वाटत होते. जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल, त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं. तेव्हाचा राग माझ्यात अजूनही आहे.”