‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अभिजित बिचुकले बिग बॉस सीझन १५ चे स्पर्धक आहेत. त्यांनी वाईल्ड कार्डद्वारे शोमध्ये प्रवेश केला होता. शोच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या स्वभावामुळे ते चर्चेत होते. अशातच आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि या चर्चेचं कारण म्हणजे त्यांना नुकतीच मिळालेली डॉक्टरेट पदवी.
अभिजीत बिचुकले यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ही डॉक्टरेट पदवी त्यांना कोणी आणि कशासाठी दिली? याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ही डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. याबाबत बिचुकले यांनी ‘साम टीव्ही’शी संवाद साधला आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी बिचुकले यांनी असं म्हटलं की, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. लोक, विद्यापीठ माझी दखल घ्यायला लागले आहेत आणि हे सर्व माझ्या कर्मामुळे होत आहे. माझं कर्म चांगलं आहे. २३ मे १९९६ रोजी म्हणजे सरासरी २८ वर्षांपूर्वी मी क्षितिज नावाचा एक बालकविता संग्रह प्रकाशित केला. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो, तिथून माझा प्रवास सुरू झाला. तुमच्यासारख्या माध्यमांना माझा प्रवास माहितीच आहे. मराठी बिग बॉस असेल, हिंदी बिग बॉस असेल, मी तिथे जाऊन ठसा उमटवला”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “यामुळे मी सातारा या संपूर्ण जिल्ह्याची ओळख बनलो. सातारा जिल्हा हा महाराष्ट्र व जगाच्या नकाशावर घेऊन जाण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे या यूनिवर्सिटीने माझ्याशी संपर्क साधला. ते विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते. त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ही डॉक्टरेट दिली आहे. आता इथूनपुढे आपण डॉक्टर अभिजीत वामनराव आव्हाडे-बिचुकले असं लावू शकतो.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “या यूनिवर्सिटीचे प्रमुख ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये आले होते. ते जादूगार आहेत आणि ते विद्यापीठाचे प्रमुखही आहेत. ते मला म्हणाले, तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, महाराष्ट्रात राहता आणि मराठीत तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देत आहोत. तुम्ही स्वीकार करालं का? असं विचारलं. त्यामुळे मी ही डॉक्टरेट पदवी स्वीकारली.”
दरम्यान, बिचुकले हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात ते नक्की कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत? हेदेखील जाहीर करणार आहेत.