पर्यावरण आणि विकास या मुद्द्यांवर जेव्हा चर्चा होते, तेव्हा या दोन्ही मुद्दे कायमच एकमेकांच्या विरोधातच उभे केले जाते. विकास हवा तर पर्यावरणाची हानी होईल आणि पर्यावरण वाचविण्याची भूमिका घेतली, तर विकास खुंटेल, असा एक बागुलबोवा उभा केला जातो. यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे भाष्य केले आहे आणि ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर.
‘टाईमपास’ या लोकप्रिय चित्रपटातून आणि आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी अभिनेत्री केतकी माटेगांवकर ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्गही आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
केतकीने तिचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “हा फोटो! या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? निसर्ग सौंदर्य. जेव्हा मी विकास पाहते, तेव्हा मला फार अभिमान वाटतो. पण निसर्ग सौंदर्याशी तडजोड करून विकास झाला तर? मग मला माझे हृदय तुटल्यासारखे वाटते. मी स्वतः टॉवरमध्ये राहते. पण जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा मला झाडे दिसत नाहीत, दिसतं ते फक्त काँक्रीटचे जंगल आणि तेव्हा मला खूप अपराधी वाटतं”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “यावर आपण मिळून काही करू शकतो का? उद्या जर मुलं आम्हाला कंटाळा आला आहे असं म्हणाले तर पालक त्यांना कुठे घेऊन जाणार? मॉल्स? की आर्केड? आपल्या सर्वांना तिथे जायला आवडते. पण ते त्यातच सर्व आलं का? आपण ज्या पंचतत्वांनी बनलो आहोत त्या पंचतत्वांशी ते जोडू शकतात का?”
यापुढे तिने आपला देश छान हिरवागार असावा एवढंच माझं स्वप्न आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की, भारत ही पुढची महासत्ता असेल, तेव्हा भारताला नैसर्गिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. भारत एक कृषीप्रधान देश आहे. सर्वात हिरवागार देश आहे” असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना “मी माझे काम करत आहे. मी आता पुढाकार घेत आहे. तुम्हीही कराल?” असं आवाहनही केले आहे. तसेच या पोस्टमध्ये तिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अभिनेते सयाजी शिंदे यांचाही उल्लेख केला आहे.