‘आपला माणूस’ म्हणूण् आपली एक वेगळी ओळख निर्माण करत मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा कलकार म्हणजे शिव ठाकरे. शिवने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत या चंदेरी दुनियेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवने एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तो ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचेही उपविजेतेपद पटकावले होते.
अशाप्रकारे अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर या रिअॅलिटी शोच्या पडद्यामागे घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल शिवने खुलासा केला आहे. शिवने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली होती याबाबत खुलासा केला आहे. या शोचा विजेता ठरल्यावर त्याला बक्षीस म्हणून २५ लाख देण्यात आले होते. पण यापैकी अर्धीच रक्कम त्याला मिळाली होती असं त्याने म्हटलं आहे.
भारतीने शिवला “बिग बॉस मराठी कसा जिंकलास?” असा प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देत शिव म्हणाला की, “बिग बॉस मराठी जिंकल्यावर जे पैसे मिळाले, त्यातले अर्धे सरकारने नेले. २५ लाख होते, त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले. माझ्यासाठी उरले १७ लाख, कर कपातीनंतर केवळ ११ लाख रुपये जमा झाले. त्यातूनही मला स्टायलिस्टला पैसे द्यावे लागले, त्यांनी माझ्या आई-वडिलांसाठी विमानाचे तिकीटही काढले नव्हते. त्यामुळे त्यांच्या तिकीटासाठीही मला पैसे द्यावे लागले”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मात्र हिंदी बिग बॉसने माझे आयुष्य बदलले. मला एवढा मोबदला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. शो नंतर, एक रील, पाहुणे कलाकार आणि सर्व पोस्ट करण्यासाठी मला मोठी रक्कम मिळायची. त्यामुळे मी एका महिन्यात एवढी कमाई करू असे कधीच वाटले नव्हते”. दरम्यान, शिवने या मुलाखतीत त्याच्या प्रवासाबद्दल अनेक गप्पा मारल्या. तसेच आगामी काळात त्याच्या नवीन चित्रपटांबद्दलही त्याने सांगितले आहे.