‘आई बाबा आणि साई बाबांची शपथ अशीच पाहिजे आपल्याला” असं म्हणत प्राजुसह अवघ्या महाराष्ट्राला आपल्या प्रेमात पडायला लावणारा दगडू लवकरच त्याच्या खऱ्या आयुष्यात बोहोल्यावर चढणार आहे. दगडू फेम अभिनेता प्रथमेश परबला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजु म्हणजेच त्याची जोडीदार मिळाली आहे. प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव क्षितिजा घोसाळकर असं असून गेले काही दिवस त्यांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत होते. अशातच लवकरच तो विवाहबंधनात अडकणार आहे.
प्रथमेश-क्षितिजा यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. प्रथमेश-क्षितिजा यांनी शेअर दोघांचं कॅलिग्राफी डुडल असलेला एक फोटो शेअर केला होता व त्याखाली २४-०२-२४ ही तारीख लिहिली होती. यावरून त्यांच्या चाहत्यांना ही त्यांच्या लग्नाची तारीख असल्याचा अंदाज वर्तवला होता. अशातच दोघांच्या लग्नाच्या तयारीलादेखील सुरुवात झाली आहे.

लग्न म्हटलं की, हळद, संगीत हे कार्यक्रम आलेच आणि याच खास कार्यक्रमासाठी प्रथमेश व क्षितिजा तयारी करतानाचे पाहायला मिळत आहे. क्षितिजाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातून हे दोघे त्यांच्या लग्नाच्या संगीत समारंभाची तयारी करत असतानाचे पाहायला मिळत आहे. क्षितिजाने प्रथमेश व कोरीओग्राफरचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

आणखी वाचा – राहुल वैद्य व दिशा परमारने पहिल्यांदा दाखवली लाडक्या लेकीची खास झलक, नेटकरी म्हणाले, “कार्बन कॉपी…”
हे खास फोटो शेअर करत क्षितिजाने संगीत समारंभाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने यांच्या कोरीओग्राफरला “तुमच्या व्यस्ततेमधून आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद” असंही म्हटलं आहे. त्यांचे हे फोटो पाहून दोघेही त्यांच्या लग्नासाठी चांगलेच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, प्रथमेशने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तो क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा करणार आहे आणि त्यानंतर लगेच १० दिवसांनी दोघांचं लग्न होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या लग्नासाठी चाहते मंडळींनाही उत्सुकता लागली आहे.