रंगभूमीतील ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका या सर्वच माध्यमांतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. या सर्व माध्यमांमध्ये प्रशांत दामले रंगभूमीवर अधिक रमले. प्रशांत यांनी तब्बल ३२ नाटकांचे सुमारे १२ हजारांहून अधिक विक्रमी प्रयोग केले, जो एक मोठा विक्रम आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी गायक, दिग्दर्शक व निर्माते या भूमिका देखील उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. (Prashant Damle Song)
तब्बल तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीला वाहून घेणारे प्रशांत दामले यांनी मराठी नाट्यसृष्टीत मोठा चाहतावर्ग तयार करत कलावंत म्हणून प्रसिद्धी मिळवली. सध्या रंगभूमीवर त्यांचं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ व ‘सारखं काहीतरी होतंय’ हे नाटक सुरु असून त्या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरही प्रशांत दामले बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा प्रशांत दामले यांना नेटकऱ्यानी ट्रोलही केलेलं पाहायला मिळालं आहे. मात्र ट्रोलर्सला वेळच्या वेळी उत्तर देतानाही ते दिसले आहेत. अशातच सोशल मिडियावरुन प्रशांत दामले यांनी नुकताच एक गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “जरा सूर बघून घेतो” असं कॅप्शन देत सुंदर असं गाणं गायलं आहे. दरम्यान या पोस्टवर नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर प्रशांत दामले यांनी दिलेलं गमतीशीर उत्तर लक्ष वेधून घेत आहे.
प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर एका चाहतीने कमेंट करत, “या वयातसुद्धा आवाज कमाल लागला आहे”, अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. या कमेंटवर उत्तर देत अभिनेते म्हणाले, “आताच तर वयात आलो आहे धन्यवाद” असं गमतीत म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “तुमच्या खास शैलीमध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेला एखादा सिनेमा आला पाहिजे. ‘मुंबई पुणे मुंबई’च्या दोन्ही भागात तुम्ही ज्या ज्या सीनमध्ये आहात त्यावेळी बाकी कुणाकडे लक्षही जात नाही. इतका जबरदस्त तुमचा स्क्रीन प्रेझेन्स आहे. एखादा तुमचा पूर्ण सिनेमा यायला हवा. तुम्हाला डोळ्यासमोर ठेऊन एखादा रोल अजूनही कोणी कसा काय लिहिला नाही कळत नाही” असं म्हणत कमेंट केली आहे. यावर उत्तर देत प्रशांत दामले यांनी, “असुदे हो, मी इथे नाटकात खुश आहे” असं म्हणत कमेंट केली आहे.