टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ ही इतके वर्ष उलटून गेली तरी आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. आठ वर्षे चाललेली ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेवर सिनेमा येणार किंवा ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा अनेक चर्चा होत होत्या. अनेक वर्षे ‘शक्तिमान’ प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता. मात्र, ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला. (mukesh khanna troll after shaktiman look)
मुकेश यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आता त्याच्या परतीची वेळ आली आहे. आपला पहिला भारतीय सुपर टीचर-सुपरहीरो. आजच्या मुलांवर अंधार आणि वाईट शक्तींचं सावट वाढत चाललं आहे. त्यामुळे ‘शक्तिमान’ परत येत आहे एक संदेश आणि उपदेश घेऊन आजच्या पिढीसाठी. त्याचं स्वागत करा.” असं म्हणत मुकेश खन्ना यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान मुकेश यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “शक्तिमानची वाट लावू नका”, दुसरा एक नेटकरी म्हणतो की, “हे अजून भूतकाळात अडकले आहेत. यांना कुणीतरी बाहेर काढा”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, शक्तिमानचा अपमान का करत आहात? आता कोणा दुसऱ्याला संधी द्या”, नंतर एकाने लिहिले की, “आता पुढे व्हा. हे कॅमिओ करु शकत होते. यामुळे त्यांचा अहंकारदेखील मिटला असता. शक्तिमान आमच्यासाठी एक खूप चांगली आठवण आहे. पण हे आता ते एक वाईट स्वप्न होण्याच्या मार्गावर आहे”. दरम्यान आता यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
‘शक्तिमान’ ‘टीजरमध्ये ‘आझादी के दिवानों ने जंग लढी’ हे गाणं म्हणताना दिसत आहे. लवकरच, ‘शक्तिमान’चे चाहते त्यांच्या बालपणीच्या आणि भारताच्या पहिल्या सुपरहिरोला पुन्हा पाहू शकतील. मात्र, लोकांमध्ये तो कधी प्रसारित होणार हे अद्याप कळलेले नाही.