Poonam Pandey Death : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेचं निधन झालं असल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे निधन झालं असल्याची माहिती सांगण्यात आली. पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला होता. तर अनेकांनी ती जिवंत असल्याचे दावेही केले. पण तेच आता खरं ठरलं आहे. पूनम जिवंत असल्याचं समोर आलं आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत जनजागृती करण्याच्या हेतून हा स्टंट केला असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं. (Poonam Pandey Is Alive)
पूनम शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबाबत बोलताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटलं की, “मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की, मी इथेच आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयच्या मुखाचा कर्करोग मला झालेला नाही. पण या आजाराबाबत माहिती नसल्यामुळे आणि ज्ञानाच्या अभावामुळे आतापर्यंत हजारो महिलांनी त्यांचे प्राण गमावले आहेत. इतर कर्करोगांप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो”.
आणखी वाचा – Poonam Pandey Death : पूनम पांडेचा मृत्यू झालाच नाही, राहुल वैद्यचा मोठा दावा, नक्की खरं काय?
“HPV लस आणि लवकरच सगळ्या तपासण्या केल्या तर यामधून महिला बाहेर पडू शकतात. कोणत्याही महिलेला या कर्करोगामुळे जीव गमवावा लागणार नाही असं साधन आपल्याकडे आहे. या कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करुया आणि प्रत्येक स्त्रीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याबाबत माहिती देऊया. या आजाराबाबत जनजागृती कशाप्रकारे करता येईल याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या कर्करोगाचा अंत करण्यासाठी चला एकत्र येऊया”. पूनमचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.