लग्न म्हटलं की मित्रपरिवारांचा गोतावळा हा आलाच आणि या मित्रपरिवारासह धम्माल मज्जा मस्तीही आली. त्यात खास मित्राचे लग्न असेल तर कोणताही जिवलग आपल्या मित्राच्या लग्नात हमखास हजेरी लावणार. नुकताच अभिनेता सिद्धार्थ बोडके हा अभिनेत्री तितीक्षा तावडेबरोबर विवाहबंधनात अडकला आहे. अगदी दिमाखात दोघांचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांच्या लग्नात मराठीसह हिंदी कलाकारांनीदेखील हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले.
हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध जोडी नील भट व ऐश्वर्या शर्मा या दोघांनी सिद्धार्थच्या लग्नात खास हजेरी लावली होती. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीतही अभियाने केला आहे. त्यामुळे मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील त्याचा मित्रपरिवार आहे. सिद्धार्थने ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत काम केले होते आणि याच मालिकेत नील व ऐश्वर्या शर्मा यांनीही काम केले होते. त्यामुळे सिद्धार्थच्या लग्नात नील व ऐश्वर्या यांनी खास हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले.
नील भट व ऐश्वर्या शर्माने सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नात खास मराठमोळा लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐश्वर्याने लग्नासाठी खास हिरव्या रंगाची सुंदर नक्षीकाम असलेली साडी परिधान केली होती. तसेच त्यावर डिझाईनर ब्लाऊजदेखील परिधान केला आहे. तर नीलनेही ऐश्वर्याच्या लूकला साजेसा हिरव्या रंगाचा कुर्ता, त्यावर डिझाईनर जॅकेट अन् सफेद रंगाचा पायजमा परिधान केला आहे.
ऐश्वर्या व नीलने त्यांच्या सोशल मीडियावर सिद्धार्थ-तितीक्षा यांच्या लग्नातील खास फोटो शेअर करत त्यांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या व नीलने तितीक्षा-सिद्धार्थबरोबरचे फोटो शेअर करत त्याखाली “एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले” असं म्हणत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना अभिनंदनही म्हटलं आहे.
आणखी वाचा – Video : असाही लग्नसोहळा! नवऱ्याने वरमाला घालताच भर मंडपात रडू लागली तितीक्षा तावडे, उपस्थितही बघत बसले अन्…
दरम्यान, नील व ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या अनेक चाहत्यांनी नील व ऐश्वर्याच्या लूकचे कौतुक केले आहे त्याकहब्रॉबर सिद्धार्थ व तितीक्षा यांना लग्नानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.