Legendary Ghazal Singer Pankaj Udhas Died : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतक्षेत्रावर व चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सर्वच स्तरातून पंकज यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर राजकीय नेतेमंडळी आणि कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
पंकज यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात की, “पंकज यांच्या निधनावर आम्ही शोक व्यक्त करत आहोत. ज्यांच्या गायकीमधून अनेक भावना व्यक्त केल्या जात. तसेच ज्यांच्या गझल थेट काळजाला भिडणाऱ्या होत्या. ते संगीताचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ होते. त्यांची गाणी ही पिढ्यान्-पिढ्या गुणगुणली जात आहेत. मला मागील काही वर्षांत त्यांच्याशी विविध विषयांवर साधलेला संवाद अजूनही लक्षात आहे. त्यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरुन निघणार नाही. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना. शांती”, असे लिहिले आहे.
त्यानंतर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील श्रद्धांजली वाहिली आहे. ते लिहितात की. “पंकज उधास यांच्या मधुर आवजाने अनेक पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या आहेत. त्यांच्या गझल व संगीताने प्रत्येक वयोगटातील श्रोत्याच्या काळजाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या जाण्याने आज संगीतक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन निघणे कठीण आहे. ते त्यांच्या गाण्यांमुळे व गझल यामुळे नेहमीच आपल्याबरोबर असतील. मी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास देवो. ओम शांती ओम”, असे लिहून आपले मन मोकळे केले आहे.
याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या भावना व्यक्त करत लिहिले आहे की, “प्रसिद्ध गायक, पद्मश्री पंकज उधास यांचे निधन म्हणजे संगीतक्षेत्राचं मोठं नुकसान आहे. प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो. ओम शांती ओम”, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे.
राजकीय नेत्यांबरोबरच अभिनेता रितेश देशमुखनेही श्रद्धांजली वाहत लिहिले आहे की, “पंकज उधास यांच्या संगीताने जगभरातील लाखों श्रोत्यांच्या काळजाला हात घातला आहे. त्यांचा वारसा हा नेहमी राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती खूप संवेदना”, असे लिहिले आहे.
गायक अदनान सामीनेदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात की, “आज माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी फक्त म्हणेन, की प्रिय पंकजजी, अलविदा..माझ्या बालपणीच्या आठवणींमध्ये तुमच्या संगीताचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी खूप धन्यवाद. ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो .त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. त्यांचे संगीत नेहमीच आपल्यात राहील”.
संगीत निर्देशक सलीम मर्चंट यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत लिहिले आहे की, “पंकजजी आपल्यात नाहीत यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे. आपण एक महान गायक व एक सच्चा व्यक्ती गमावला आहे”. असे म्हणत आपले मन मोकळे केले आहे.