आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांचा हाच वारसा वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनीही मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपली कारकीर्द घडवली. नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रातून नयना आपटे यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून नयना आपटेंनी मराठी, हिंदी व गुजराती चित्रपट आणि रंगभूमीवर अभिनय करत विविधांगी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर बदलत्या काळाप्रमाणे होणारे अनेक बदल स्वीकारत मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये टिकून राहत त्यांनी आपली यशस्वी वाटचाल आजही सुरूच ठेवली आहे.
‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या गुणी अभिनेत्रीला मानवंदना तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ मुंबईत ‘अमृतनयना’ या विशेष सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने नयना आपटेंनी ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांना तुमच्या आत्मचरित्रात तुमच्या भूमिका, तुमचा अभिनय व तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेमकं काय मांडलं आहे असा प्रश्न विचारण्यात आला.

याचे उत्तर देत नयना आपटे यांनी असं म्हटलं की, “कलाकारांनी आत्मचरित्र वगैरे लिहू नये असं मला वाटतं. आत्मचरित्र न लिहिता कलाकारांनी आपले अनुभव लिहावेत. आत्मचरित्र लिहून काय करायचं आहे? प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार हे असतातच. त्यात विशेष असं काय आहे. मोठं होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. त्यामध्ये विशेष असं काही नाही. अनुभव लोकांसमोर ठेवले पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला जर काही संशोधन करायचे असेल तर त्यादृष्टीने ते पुस्तक वाचतील. त्यासाठी मी हे केलं.”
आणखी वाचा – प्रथमेश परबच्या बायकोच मंगळसूत्र आहे खूपच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा, डिझाइनने वेधलं लक्ष
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आत्मचरित्र वगैरे असं काही नसतं. वाचणाऱ्याला वाटतं असतं की ते आत्मचरित्र आहे. त्यामुळे आपण अनुभव लोकांसमोर ठेवले पाहिजेत. म्हणजे ते लोकांच्या उपयोगी येतील. आपण एक संपूर्ण पंचपक्वानाने परिपूर्ण असलेलं ताट लोकांसमोर मांडायचं. त्यातलं लोकांना जे जे आवडेल ते ते घेतील”.
आणखी वाचा – लग्न लागताच बायकोच्या पाया पडला प्रथमेश परब, पत्नीनेही नमस्कार केला अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
दरम्यान, १९६५ सालापासून नयना आपटे यांची व्यावसायिक अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू झाली आणि ती आजवर सुरुच आहे. तसेच नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत आणि काही गुजराती नाटकांतून भूमिका साकारल्या आहेत.