सध्या चित्रपटसृष्टीमध्ये लगीनघाई सुरु आहे. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकरच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच आता आणखी एक जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. सिद्धार्थचा हळद दळणीच्या विधीचाही फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला होता. दोघंही आयुष्यातील सुंदर दिवसासाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यानचेच काही फोटो व व्हिडीओ आता समोर येत आहेत. तितीक्षाही लग्नापूर्वी आपल्या कुटुंबियांबरोबर एकत्र वेळ घालवत आहे. आता तितीक्षाच्या मेहंदी कार्यक्रमचा फोटोही समोर आला आहे. (Titeeksha Tawade Siddharth Bodke Wedding)
तितीक्षा व सिद्धार्थने मराठी मालिकांमध्ये एकत्र काम केलं. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मालिकांमध्ये काम करता असतानाच त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. मात्र तितीक्षा व सिद्धार्थने कधीच त्यांच्या नात्याबाबत उघडपणे स्वीकार केला नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनीही चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता लवकरच दोघं लग्न करणार असल्याचंही समोर आलं आहे. तसेच त्यांची लग्नाची तारीखही समोर आली आहे.
त्यापूर्वीच तितीक्षा तिचा मेहंदी कार्यक्रम एन्जॉय करताना दिसली. तिच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी रंगली आहे. मेहंदीची खास डिझाईन विशेष लक्ष वेधून घेत आहे. २६ फेब्रुवारी (सोमवारी) ठाण्यामध्ये तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. आज दोघांचाही हळदी समारंभ असल्याची चर्चा सोशल मीडियावरही सुरु आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यासाठी चाहतेही कमालीचे उत्सुक आहेत.
लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात होण्यापूर्वी तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाचे बरेच फोटो व्हायरल झाले. त्यांच्या काही जवळच्या कलाकार मित्रांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. तर बहीण खुशबू तावडेने दोघांना पहिलं केळवण दिलं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता तितीक्षा व सिद्धार्थच्या प्रेमाचं रुपांतर लग्नामध्ये होणार आहे. याआधीही त्यांचे बरेच एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता खऱ्या आयुष्यातही तितीक्षा व सिद्धार्थ त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.