छोटा पडदा म्हणजेच टीव्ही हे मनोरंजनासाठी कायमच प्रेक्षकांचे सोयीचे माध्यम ठरला आहे आणि छोट्या पडद्यावरील मालिका या अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतात, मालिकांचे आगळेवेगळे कथानक प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. अशीच आपल्या आगळ्या वेगळ्या कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका. ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कधी एजे म्हणजेच अभिराम आणि लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची लाडकी होताना दिसत आहे. अशातच आता मालिकेत नवे वळण आले असून, लीला अभिरामच्या प्रेमात पडल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
झी मराठी या वाहिनीने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये अभिरामने काही दिवसांपूर्वी म्हटल्याप्रमाणे त्याच्या कुटुंबातील सर्व जण क्रूझवर गेले आहेत. यावेळी एजेच्या प्रेमात पडलेली लीला तिच्या मनातील भावना अभिरामला सांगाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वेळा ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. या नवीन प्रोमोमध्ये लीला एजेबद्दल तिला वाटणारं प्रेम व्यक्त करणार आहे. पण हे प्रेम व्यक्त कसे करावे याबद्दलची तिची धांदळ या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये एजे सर्वांना आपण आता क्रूझवर भेटू. यात मला कोणत्याही चुका नको आहेत” असं म्हणून निघून जातो. पुढे लीला एजेबद्दल असं म्हणते की, “एजेंशिवाय मी दिवस कसा काय काढणार पण ते उद्या भेटतीलच ना…” यापुढे लीला स्वत:शीच बोलत असं म्हणते की, “एजे फक्त भेटणारच नाहीत तर तू त्यांना स्वत:च्या मनातलं सगळं सांगणार आहेस. पण कसं सांगू? गुडघ्यावर बसून थेट सांगून एजे तुम्ही मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडता. पण यात काही मज्जाच नाही. सगळ्यांसमोर जोरात ओरडून सांगेन. एजे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे”.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओलाअ चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसादही दिला आहे. मालिकेतील हे कथानक तसंच लीला व एजे यांची ही जोडी त्यांना आवडत आहे. एजे व लीलामध्ये सुरुवातीला मोठे गैरसमज होते. मात्र आता लीला एजेच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लीला तिच्या भावना एजेला सांगू शकणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.