Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा जोरदार सुरू आहे. अशातच सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंतची लोकप्रियतासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’चा विजेता असलेल्या अभिजीत सावंतने सुरेल आवाजाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील त्याचा खेळ पाहून प्रेक्षक त्याच्या जिद्दीचं आणि चिकाटीचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अभिजीतला जोरदार पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अभिजीतच या शोचा विजेता होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. (Sonu Nigam support to Abhijeet Sawant)
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. यंदाचं पर्व शंभर दिवसांऐवजी अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या घरात एकूण ७ सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने ‘तिकीट टू फिनाले’च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे उर्वरीत सदस्यांना आता मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. घरातील आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सर्वजण प्रेक्षकांना आवाहन करत आहेत. अशातच बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमनेही खास व्हिडीओ शेअर करत अभिजीतला आपला पाठिंबा दिला आहे.
अभिजीतच्या सोशल मीडियावर सोनू निगमचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनूने असं म्हटलं आहे की, “प्रिय अभिजीत, तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात खूप छान खेळत आहात. ‘बिग बॉस मराठी’बद्दलची तुमची सर्व माहिती मला मिळत आहे आणि तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला मी खूप चांगलं ओळखतो. तू खूप चांगला माणूस आहेस आणि अगदी योग्य आहात. तू जे पण करशील चांगलंच करशील असा मला विश्वास आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि माझी सर्वांना विनंती आहे की अभिजीतला जास्तीत जास्त मत देऊन जिंकवा. लवकरच भेटू”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा
दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.