‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपायला आले आहे. अवघ्या दोन दिवसांवर या पर्वाचा महाअंतिम सोहळा आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्यापैकी एक कारण म्हणजे जान्हवीने पॅडी कांबळेंचा केलेला अपमान. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान जान्हवी पॅडी यांना असे म्हणालेली की, “आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग केली आणि आता इथे येऊन ओव्हर अॅक्टिंग करत आहेत”. त्यानंतर लगेच तिने पॅडी यांची माफी मागितली, मात्र यामुळे तिला प्रेक्षकांच्या प्रचंड मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तिने केलेल्या वक्तव्याबद्दल अनेकांनी निषेध व्यक्त केला होता. यावेळी पॅडी यांची मैत्रीण व सहकलाकार विशाखा सुभेदार यांनीही भली मोठी पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच आता पुन्हा एकदा विशाखा यांनी जान्हवीने केलेल्या वक्तव्याबद्दल आपली तोफ डागली आहे. (Vishakha Subhedar On Paddy Kamble Insult)
गेल्या आठवड्यात पॅडी कांबळेंचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपला. त्यानंतर पॅडी व विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. या संवादात विशाखा यांनी जान्हवीने पॅडी यांना ‘जोकर’ व ‘ओव्हर अॅक्टर’ बोलल्यावरुन तिचा समाचार घेतला. विशाखा यांनी जान्हवीने केलेल्या वक्तव्याबद्दल असं म्हटलं की, “जोकर आणि ओव्हर अॅक्टर बोलण्याचा जो मुद्दा झाला होता तिथे माझी तार सटकली होती. म्हणजे तू एक कलाकार आहेस आणि कलाकार म्हणून तू दुसऱ्या कलाकाराला असं अपमानित करुच शकत नाही. राष्ट्रीय टेलिव्हिजनवर तुम्ही असं अपमान नाहीच करायचा. वर्षाताईंना ती बोलली तेव्हाही मला राग आला होता. पण मला कळत नव्हतं. हा गेम आहे की काय? असं वाटलं. पण ती जेव्हा पॅडीबद्दल बोलली तेव्हा मी तो भाग संपूर्ण पाहिला आणि मी चिडले. तेव्हा रात्री दोन वाजता पॅडीबद्दलची ती पोस्ट लिहिली की तू असं वागणं चुकीचे आहे वगैरे वगैरे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून आणखी एक जण घेणार निरोप, कोण असेल हा सदस्य? ‘या’ स्पर्धकाच्या नावाची चर्चा
यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं की, “तेव्हा वाटलं नव्हतं की, माझी ती पोस्ट व्हायरल होईल आणि त्याला इतका पाठींबा मिळेल असं… मी माझ्या सोशल मीडियावर मला जे वाटेल ते शेअर करत असते. त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार मी नाही करत. पण ती जोकर बोलली तेव्हा मी म्हटलं तुझा जन्म साधारण १९९८ चा वगैरे असेल आणि तेव्हा पॅडीने त्याच्या करिअरला सुरुवात करुन २००८ मध्ये तो प्रसिद्धीच्या शिखरावर होता. तेव्हा तू पाळण्यात असशील आणि जेमतेम मऊ भात खात असशील. तर तू असं जोकर किंवा ओव्हर अॅक्टर नाही म्हणू शकत. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा असा अपमान करणे यासारखं पाप नाही. तू फक्त त्याचा नाही तर त्याला मदत करणाऱ्या, त्याला काम देणाऱ्या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा अपमान केला आहे. त्यामुळे माझा पण अपमान झाला असं मला वाटलं.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “ती पॅडीला जेव्हा सॉरी बोलली तेव्हा मला ते अजिबातचं पटलं नव्हतं. दु:खी व कष्टी होऊन ती सॉरी बोलली मला ते खोटं आणि नाटक वाटलं होतं. त्यामुळे ती बरी पण अभिनेत्री नसावी. ती बाहेर आल्यावर मी भेटणार आणि तिला बोलणार आहे. रागाच्या भरात आपण टीव्हीवर काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. त्यामुळे ती रडून सॉरी बोलली असली तरी मला तो गेम वाटला. मला वाटलं नाही ती मनापासून सॉरी बोलली की काय… तर ती बाहेर येऊन मी तिला त्याची जाणीव करुन देणार आहे”.