शशांक केतकर याने आजवर त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिका विश्व गाजवणारा शशांक सध्या ‘मुरंबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने आजवर प्रेक्षकांची मन जिंकली. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय शशांकने ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘पाहिले न मी तुला’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. (Shashank Ketkar New Car)
सोशल मीडियावर ही शशांक बऱ्यापैकी सक्रीय असतो. समाजातील विविध गोष्टींवर बरेचदा तो भाष्य करताना दिसतो. एखादी गोष्ट न पटल्यानंतर शशांकची पोस्ट आली नसेल असं होणे नाही. काही दिवसांपूर्वी शशांकने नागरिकांनी व महानगरपालिकेने स्वच्छतेबाबत घेणाऱ्या काळजीबाबत भाष्य केलं होतं. यानंतर आता शशांकने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
शशांकने नवी कोरी इलेक्ट्रिक कार घेतली असल्याची आनंदाची बातमी त्याने चाहत्यांसह शेअर केली आहे. शशांकच्या या नव्या कार मागील खास वैशिष्ट्य म्हणजे शशांकने ना पेट्रोल ना डिझेलची कार घेता सध्याच्या जगात गरज असणाऱ्या इलेक्ट्रिक कारची त्याने निवड केली आहे. पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाची बचत करत शशांकने विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेलं पाहायला मिळत आहे. शशांकने त्याच्या या नव्या गाडीचे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “नवीन तंत्रज्ञानाने मला कायमच भुरळ घातली आहे. इलेक्ट्रिक गाडी असा काही प्रकार असतो हे ज्या वयापासून मला कळू लागलं आहे तेव्हापासून, आपण एकदा एक इलेक्ट्रिक गाडी घ्यायची हे स्वप्नं होतं”
यापुढे त्याने म्हटलं आहे की, “मागच्या १४ वर्षात माझ्या तीन गाड्या झाल्या. मागच्या वर्षी जेव्हा मी ठरवलं योग्य वेळं आली की पेट्रोलच्या गाडीवरुन मी इलेक्ट्रिक गाडीवरसुद्धा शिफ्ट होईन. आणि वर्षभरातच इलेक्ट्रिक गाडी दारात आली” असं म्हणत त्याने नवी गाडी घेतली असल्याची खुशखबर दिली. शशांकच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी त्याला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.