‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा बॉलीवूड चित्रपटांत अभिनय करत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील.
छाया कदम या अभिनय क्षेत्रात अपघाताने आल्या. पण या क्षेत्रात येण्याअगोदर त्यांचा संघर्ष, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले काही आघात, त्यांचे आईशी असलेले नाते यासह त्यांची बॉलिवूडमधील एण्ट्री याबद्दल फारच कमी लोक जाणतात. आणि त्यांच्या याच प्रवासाबद्दल खास गप्पा मारण्यासाठी छाया कदम यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अगदी मनमुरादपणे संवाद साधला.
यावेळी छाया कदम यांना “तुम्ही आजवर केलेल्या अभिनयासाठी तुमच्या आईकडून तुम्हाला कधी कौतुकाची थाप मिळली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत छाया कदम यांनी असे म्हटले की, “प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असावी लागते. सुरुवातीला माझ्या आईला यातलं फार काही कळत नव्हतं आणि मी तेव्हा जास्त कामही केलं नव्हतं. मी काम करायला सुरुवात केली, त्यानंतर आई हळूहळू सर्व विसरत चालली होती. तिला काही आठवत नव्हतं. तेव्हा मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. कारण इंडस्ट्रीत माझं कौतुक होत होतं. पण आपल्या माणसाकडून (आईकडून) कौतुकाची थाप मिळत नव्हती. तिचं असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “आईचं आणि माझं नातं हे खूपच खास होतं. इतर मुली लग्न किंवा कामानिमित्त घराबाहेर जातात. पण माझ्या बाबतीत ते झालं नाही. त्यामुळे मी कायम २४ तास तिच्याबरोबर राहायची. लॉकडाउनच्या काळात आम्ही खूप काळ एकत्र घालवला आहे. पण ती हळूहळू गोष्टी विसरायला लागली होती. त्यामुळे त्या काळात मी तिची आई आणि ती माझी बाळ झाली. आज माझी आई हयात नसली तरी ती कायम माझ्याबरोबर आहे हा माझा विश्वास आहे.”
आणखी वाचा – असा पार पडला ‘भागो मोहन प्यारे‘ फेम अभिनेत्रीच्या लेकाचा बारसा, नावाचा खास अर्थ सांगत शेअर केला फोटो
दरम्यान, छाया कदम यांना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातत मातृशोक झाला होता. छाया कदम यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आईच्या निधनाची बातमी दिली होती. छाया कदम व त्यांच्या आईचे नाते हे खूपच खास होते. त्यामुळे ‘मज्जाच्या अड्ड्या’वर आईबद्दल व्यक्त होताना छाया कदम त्यांच्या आईच्या आठवणीत खूपच भावुक झाल्या असल्याचे पाहायला मिळाले.