‘फँड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’यासारख्या दर्जेदार चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री छाया कदम यांनी केवळ मराठी चित्रपटांतच नव्हे तर बॉलिवूड चित्रपटांमधूनही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘झुंड’, ‘गंगुबाई काठियावाडी’ यांसारख्या मोठया हिंदी चित्रपटातही छाया कदमसारखा मराठमोळा चेहरा झळकला. ‘फाट्याचं पाणी’ या लघुपटातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी अनेक लघुपट, सिनेमे तसंच मालिकांमध्येही काम केलं. मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाचं कौतुक होत असताना त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचं नशिब आजमावलं. (Chhaya Kadam On Amitabh Bachchan)
झुंड चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलं. यावेळचा एक किस्सा त्यांनी नुकत्याच दिलेल्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमावेळी सांगितला. हा किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “‘झुंड’ चित्रपटावेळी मला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळालं. नागराजला मी भेटायला गेले तेव्हा तो मला म्हणाला तुला माहित आहे का रेखा, हेमा मालिनी यांच्यानंतर आता तू अमिताभ यांच्या बायकोचा रोल करणार आहेस. हे ऐकून मला धक्काच बसला”.
त्या पुढे म्हणाल्या, “शूटिंगच्या आधी खूप ठरवलं होतं की, अमिताभजींबरोबर असं बोलायचं, अशा गप्पा मारायच्या, असे फोटो काढायचे पण तिथे गेल्यावर तसं काही घडलंच नाही. तिथे चित्र वेगळं होतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन होते. आमचं बोलणंच व्हायचं नाही. तेव्हा मलाच प्रश्न पडला त्यांना माहीत आहे ना मी त्यांच्या बायकोची भूमिका साकारत आहे. नागराजने माझी पाहिल्या दिवशी त्यांच्याशी ओळख करून दिली होती. एकेदिवशी मी शूटला गेले तेव्हा मला कळलं की आज माझा व अमिताभजी यांचा दोघांचा एकत्र प्रवासाचा सीन आहे. हे ऐकल्यावर माझ्या मनात आलं चला आज तरी आपलं बोलणं होईल. टीमकडून कळलं की बैलगाडीत शूट आहे. म्हणून मी बैलगाडी पाहायला गेले की ती बैलगाडी किती लहान आहे वा मोठी आहे. म्हणजे मला कळेल की, त्या बैलगाडीत आम्ही एकमेकांच्या किती जवळ बसणार आहोत. म्हणजे किमान सीनदरम्यान काहीतरी बोलणं होईल”.
यापुढे त्यांनी सीनदरम्यान घडलेला प्रसंग सांगितला, त्या म्हणाल्या, “सीन सुरु झाला, अमिताभजी आले ते बैलगाडीवर बाहेरच्या बाजूला पाय सोडून बसले. आणि मी त्यांच्या बाजूला बसायला जाणार इतक्यात बैलगाडीचा तोल एकीकडे जाऊ लागला म्हणून त्या बैलगाडी चालकाने मला त्याच्या बाजूने बसायला लावलं. तेव्हा मला असं झालं की, अरे यार काय आहे हे. त्यानंतर आम्ही फेरी मारुन आलो. शेवटी उतरायच्या वेळी ते पटकन पाय खाली ठेवून उतरले. मला मात्र उभं राहून पुढे येऊन खाली उतरायचं होतं, त्यात माझ्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झालं आहे त्यामुळे मला पटकन उठता-बसता येत नाही. आणि हे नागराजच्या टीममध्ये सर्वांना माहित आहे. मी उतरायला जाणार इतक्यात नागराज आला. नागराजने मला हात दिला, आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूने अमिताभजींनी हात दिला. तेव्हा मला असं झालं काय करु? मी द्विधा मनस्थितीत अडकले. आणि तेव्हा मनात आलं की, ही संधी का सोडावी. असं म्हणत मी पटकन अमिताभजींचा हात पकडला आणि उतरले तेव्हा माझ्या तोंडून निघून गेलं की, चला हातात हात तर आला. असं मी त्यांच्यासमोरचं बोलले. तेव्हा ते पण गालातल्या गालात हसले आणि पुढे गेले”.
याशिवाय अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा आणखी एक किस्सा सांगत त्या म्हणाल्या, “त्यानंतर आणखी एका सीनदरम्यान आमचं बोलणं झालं, तेव्हा त्यांनी माझ्या घरच्यांबद्दल चौकशी केली. मी म्हणाले माझ्या घरी माझी आई असते वगैरे वगैरे गप्पा सुरु होत्या. माझ्या आईला विसरण्याचा आजार होता. आणि वयानुसार तो आजार वाढत गेला. मी अमिताभजींना सांगितलं माझी आई तीन व्यक्तींना कधीच विसरली नाही, एक साईबाबा, दोन स्व. बाळासाहेब ठाकरे आणि तीन अमिताभ बच्चन. हे मला त्यांना सांगायला मिळालं याचा मला खूप आनंद झाला”.