अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते, निवेदक म्हणून आदेश बांदेकरांचा नावलौकिक आहे. तर मराठीसह हिंदी चित्रपटांतून अभिनय करत हिंदी व मराठी प्रेक्षककांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सूचित्रा बांदेकर. आदेश व सुचित्रा बांदेकर यांना कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा सोहम बांदेकरनेही याच क्षेत्रात पदार्पण केले आहे. सोहम हा सध्या अभिनेता व निर्मात्याच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर झळकला. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
अशातच तो स्टार प्रवाहवरील दोन मालिकांच्या निर्मितीची धुराही अगदी यशस्वीपणे पार पाडत आहे. स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या निर्मिती ही आदेश व सूचित्रा बांदेकरांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत होत असून सोहम याकडे जातीने लक्ष देत असतो. मालिकेत सध्या ऐश्वर्या व सारंग यांचे लग्न होणार आहे. यावेळी सोहमही तिथे उपस्थित होता. यावेळी ‘इट्स मज्जा’ने सोहम बरोबर खास संवाद साधला.
या संवादादरम्यान, सोहमला त्याच्या खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार असल्याचे विचारण्यात आले. याचे उत्तर देत त्याने असं म्हटलं की, “लोकांना माझं वय हे उगाचच जास्त वाटत आहे. मी त्यांना ३२ वर्षांचा वगैरे वाटत आहे. पण मी इतका मोठा असून माझं वय २७ वर्ष इतकेच आहे” असं म्हटलं. तसेच त्याने मस्करीत “लोकांना माझं सुख पाहावत नाहीये” असंही म्हटलं. तसेच यापुढे त्याने त्याच्या भावी पत्नीविषयीच्या अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.
सोहमने त्याच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा व्यक्त करत असं म्हटलं की, “मला जोड्याने मारणारी बायको नको. मी ज्या क्षेत्रात काम करत आहे, त्या क्षेत्रात १२ तासांची शिफ्ट असते. त्यामुळे घरी फार कमी वेळ देता येतो. त्यामुळे यांच्या दोघांत वेळेबाबत संगनमत झाले पाहिजे. तसेच या क्षेत्रातील लोकांचे कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्य नसते. त्यामुळे ते समजून घेणारी व आई-वडील जी सांगतील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे.”
तसेच यापुढे सोहमने थाटामाटात किंवा फार खर्चीक पद्धतीने लग्न करणार नसल्याचे म्हटले. सोहमने नोंदणी पद्धतीने कोर्टात कुटुंबियांच्या समवेत लग्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच लग्नात होणारा खर्चाचा मी माझ्या भविष्यासाठी वापर करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.