कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना कलाकारांना बऱ्याच चढ-उतारांचा सामना करावा लागतो. काम मिळवण्यासाठी करावी लागणारी मेहनत तसेच प्रत्येक भूमिकेसाठी किती मानधन मिळणार? हा मोठा प्रश्न असतोच. काही कलाकारांना तर केलेल्या कामाचं मानधनही दिलं जात नाही अथवा कामाचे पैसे रखडवले जातात. असंच काहीचं मराठी अभिनेता शशांक केतकरच्या बाबतीत घडलं आहे. शशांकने फेसबुकद्वारे सविस्तर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
मराठी चित्रपटाच्या एका निर्मात्याने शशांकचे पैसे थकवले असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याचे निर्मात्याची कानउघडणी केली आहे. शशांक म्हणाला, “मी आणखी एका फसवणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर काम केलं आहे. ज्या प्रॉडक्शन हाऊसने मला xxxxxxx लाख रुपये देण्याचं मान्य केलं होतं. त्यांच्या अपेक्षेनुसार मी पूर्ण कामही करुन दिलं. (डबिंग वगळता)”.
आणखी वाचा – बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट असूनही ‘सुभेदार’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी, एका आठवड्यातच कमावले इतके कोटी
“गेल्या काही महिन्यांपासून मी या फसव्या प्रॉडक्शन हाऊसचा पाठपुरावा करत आहे. मात्र प्रत्येकवेळी त्या लोकांनी मला कारणं दिली. मी एका मराठी चित्रपटाबाबत बोलत आहे ज्या चित्रपटात इंडस्ट्रीमधील मोठी नावं आहेत. त्या बड्या कलाकारांना त्यांच्या कामाचे पैसे आधीच देण्यात आले आहेत. पण मी आणि टीममधील इतर बऱ्याच लोकांना २० टक्केही मानधन देण्यात आलं नाही”.
पुढे तो म्हणाला, “संपूर्ण माहिती तसेच निर्माते व माझ्यामध्ये झालेला संवाद याचा संपूर्ण तपशील योग्य त्यावेळी मी प्रसार माध्यमांसमोर मांडणार आहे. गंमतीचा भाग म्हणजे एखाद्याला अभिनय येत नसेल तर त्याला आपण कलाकार म्हणत नाही. मग ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला आपण निर्माता का म्हणतो?”. शशांकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तू योग्य आहेस असं म्हटलं आहे.